महिन्यातून ‘या’ दिवशी “तेजस्विनी” बस मधून करा मोफत प्रवास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दर महिन्याच्या ८ तारखेला ‘तेजस्विनी’ बसमधून प्रवासी महिलांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. महिला दिनाचे औचित्य साधून महापौर मुक्ता टिळक यांनी ही घोषणा केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर शहरातील तेजस्विनी गाडय़ांच्या १४ मार्गावर ही सुविधा राहणार असून त्यामुळे पीएमपीला येणारी तूट पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांकडून देण्यात येणार आहे. पीएमपीच्या संचालक मंडळाची बैठक बुधवारी झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शुक्रवारपासून या सेवेला प्रारंभ होणार आहे. गेल्या वर्षी महिला दिनी राज्य सरकारने महिलांसाठी ३३ तेजस्विनी बस दिल्या होत्या. ह्यावर्षी आणखी नवीन ३३ बस मिळणार असून यातील ६ बस पीएमपीएलच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. पीएमपीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार , नव्या २७ बस दाखल झाल्यावर आणखी सुमारे २० मार्गांवर महिला स्पेशल बस सोडण्यात येणार आहेत.
या मार्गांवर मोफत प्रवास –
कात्रज ते शिवाजीनगर, अप्पर डेपो ते शिवाजीनगर, कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, हडपसर ते वारजे-माळवाडी, कोथरूड ते कात्रज, भेकराईनगर ते महापालिका भवन, स्वारगेट ते धायरी, मनपा भवन ते लोहगांव, मनपा ते वडगांवशेरी, मार्केटयार्ड ते पिंपळे गुरव, अप्पा बळवंत चौक ते सांगवी, मनपा ते आळंदी, मनपा ते आकुर्डी रेल्वे स्थानक, निगडी ते हिंजवडी-माण फेज-३