आता अपघातातील जखमींवर होणार मोफत उपचार, परिवहन मंत्रालयाची योजना

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – अनेकदा जखमी रस्त्यावरच पडून राहतो. त्याला वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकदा त्याचा मृत्यू होतो. असा अपघात झाल्यास घटनास्थळावर जमा झालेले लोकही जखमीला सरकारी रुग्णालयात घेऊन जातात. मात्र, सरकारी रुग्णालय लांब असेल तर जखमीचा जीव जाऊ शकतो. आता मात्र अपघात स्थळापासून जवळ असलेल्या खासगी रुग्णालयात (private hospitals) किंवा नर्सिंग होममध्ये जखमीवर नि:शुल्क उपचार होऊ शकणार आहेत.

परिवहन मंत्रालयाकडील या योजनेनुसार रस्ते अपघातांतील जखमींवर १.५ लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांची सोय केली जाईल. अपघातस्थळापासून रुग्णालय आणि दुसरीकडे पाठवण्याचा खर्चही सरकार सोसेल. या शिवाय रस्ते अपघातात अपंगत्व आल्यास पाच लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचीही तरतूद करण्यात आली आहे. दुर्घटनेत मृत्यू झाल्यास ही रक्कम त्याच्या कुटुंबाला दिली जाईल. उपचारांच्या खर्चाची ही तरतूद वाहन दुर्घटना फंडमधून केली जाईल. वाहनांचा विमा करणाऱ्या जनरल इन्शुरन्स कंपन्यांच्या कमाईचा एक भाग कॅशलेस उपचारांसाठी देण्याची तरतूद केली गेली आहे. दरवर्षी रस्ते अपघातात साडेपाच लाखांपैकी जवळपास साडेचार लाख लोकांना थेट लाभ होईल. जखमीवर उपचार करण्यासाठी पैशांची वाट पाहावी लागणार नाही.
दरम्यान, मंत्रालयाने बनवलेल्या राष्ट्रीय कॅशलेस ट्रीटमेंट योजनात विदेशी पर्यटक तथा तीर्थयात्रींनाही समाविष्ट केले आहे. योजनेंतर्गत एक्स्प्रेस वे, ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वे, राष्ट्रीय राजमार्ग, राज्य राजमार्ग, जिल्हा तथा इतर रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांत जखमी झालेले समाविष्ट असतील.