निवृत्तीनंतरही पोलिसांना व त्यांच्या कुटुंबियांना मिळणार मोफत उपचार : मुख्यमंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – निवृत्तीनंतरही पोलिसांना व त्यांच्या कुटुंबियाना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सुमारे १२०० आजारांवर मोफत उपचार उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) केली. मुंबई पोलिसांच्या वतीने आयोजित ‘उमंग’ कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.

यावेळी अमृता फडणवीस, ग्राम विकासमंत्री पंकजा मुंडे, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पोलिसांच्या घराबाबत शासनाने वेळोवेळी सकारात्मक निर्णय घेतला आहे. पोलिसांच्या कल्याणासाठी ही शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मुंबईच्या विकासात पोलिसांचे मोठे योगदान आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेची महत्त्वपूर्ण जबाबदारी मुंबई पोलिसांवर आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलिसांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. दिग्दर्शक रोहित शेट्टी व अमिताभ बच्चन यांनी पोलीस कल्याण निधीस प्रत्येकी ५१ लाख रुपयांची मदत केल्याबद्दल मुख्यमंत्री यांनी आभार मानले. अमिताभ बच्चन, आमीर खान, अजय देवगण, अक्षयकुमार शिल्पा शेट्टी यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील दिग्गज यावेळी उपस्थित होते