मोफत व्हाऊचर प्रकरणी अखेर डी-मार्टची पोलिसांकडे धाव 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

डी-मार्टच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांना खरेदीवर अडीच हजारांचे मोफत व्हाऊचर देण्यात येत आहे, असा संदेश व्हाट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याने देशभरात गोंधळ उडाला. ग्राहकांनी डी-मार्टमध्ये गर्दी केली. त्यामुळे अखेर हा संदेश खोटा असल्याचा बोर्ड डी-मार्टने लावला. खोटा संदेश पसरविणा-याविरुद्ध पवई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशभरात डी-मार्टच्या १५५ शाखा आहेत. महाराष्ट्रासह गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगढ, एनसीआर, तामिळनाडू, पंजाब, राजस्थान या ठिकाणी त्यांचे जाळे आहे. १० जूनपासून त्यांच्या अडीच हजारांच्या मोफत व्हाऊचरचा संदेश व्हायरल झाला. संदेशाबरोबरच एक लिंकही होती. या लिंकवर क्लिक केल्यानंतर वैयक्तिक माहिती दिल्यावर व्हाऊचर तुमच्या ई-मेल आयडीवर येणार असल्याचा संदेश येत असे. संदेश पुढे १५ जणांना पाठविण्याचे आवाहनही यात होते. अनेकांनी या साइटवर क्लिक केले. अखेर हाती काहीच न लागल्याने त्यांनी डी-मार्टकडे चौकशीसाठी धाव घेतली.

या संदेशाबरोबरच सावधानतेचा संदेश देणारा दुसरा संदेशही व्हाट्सअ‍ॅपवर फिरु लागला़ त्यात डी मार्टच्या संदेशातील लिंकवर तुम्ही क्लिक केले तर, तुमच्या मोबाईलवरील सर्व डाटा दुसºयाकडे ट्रान्सफर होऊन तुमच्या बँक खात्यावर हल्ला होऊ शकतो, असा त्यात म्हटले होते.

या दोन्ही संदेशाबाबत सोशल मीडियावरही चर्चा रंगल्या. डी-मार्ट कर्मचाºयांना याचा नाहक मनस्ताप झाला. अखेर काही ठिकाणी हा संदेश खोटा असल्याचे बोर्ड डी-मार्टमध्ये लागले. पवई येथील डी-मार्टमधील विभाग व्यवस्थापक सिद्धार्थ मधुकर घायतडके यांनी याबाबत पवई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.