‘इंस्टाग्राम’वर तिची झाली मैत्री, मित्रानं ‘पहिल्या’च भेटीत ‘ड्रिंक’ देऊन केला ‘बलात्कार’

आग्रा : वृत्त संस्था – सोशल मिडियावर झालेल्या मैत्रीतून अनेकदा लाखो रुपयांची फसवणुक होत असल्याचे दररोज उघड होत येताना दिसत आहे. मात्र, या सोशल मिडियावरील मित्राने पहिल्याच भेटीत आग्रा येथील एका तरुणीच्या अब्रुवरच घाला घातला. इंस्टाग्रामवर झालेल्या मैत्रीतून ती एका तरुणाला पहिल्यांदाच भेटली. तेव्हा त्याने दारु पाजली व ती नशेत असताना तिच्यावर बलात्कार केला.

पोलिसांनी आरोपीला अलिगडमधून अटक केली आहे. दर्श गौतम (वय २३) असे त्याचे नाव असून तो आग्रा येथील एका खासगी संस्थेत डिप्लोमाचा कोर्स करत आहे. आग्र्याचे एसएसपी बबलु कुमार यांनी या प्रकरणाची माहिती पत्रकारांना दिली. पीडित तरुणी आणि २० वर्षाचा आरोपी यांची एक महिन्यांपूर्वी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले होते.

दोघांमध्ये चॅटिंगही सुरु झाले. त्यानंतर त्यांनी भेटायचे ठरविले. दर्श याने या तरुणीला एका हॉटेलमध्ये नेले. तेथे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी संगनमत करुन तिला व्होडका पाजली. दारु पिल्यामुळे ही तरुणी नशेत बेशुद्धावस्थेत गेली. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला व तो पळून गेला. एका तासानंतर ही तरुणी शुद्धीवर आली. तेव्हा तिला आपल्या प्रायव्हेट पार्टवर जखमा आढळून आल्या. आपल्याबरोबर घडलेल्या प्रकार तिला कळला. तिने पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली.

पोलिसांनी हॉटेलमधील आणि आजू बाजूचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन आरोपीचे छायाचित्र मिळविले. त्याचा तपास सुरु केला तेव्हा तो अलिगडला गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला मित्रांसोबत लग्नाला जाताना पकडले. दर्श गौतम याने आपला गुन्हा कबुल केला असून पोलिसांनी त्याचे तीन मित्र आणि हॉटेल कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.