फेसबूकवरील ‘त्या’ महिलेने अधिकाऱ्यास घातला अडीच कोटींचा गंडा

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – एका थाय दूतावासातील व्हिसा अधिकाऱ्याने फेसबुकवर अज्ञात महिलेची रिक्वेस्ट स्विकारली. मात्र ही मैत्री या अधिकाऱ्याला चांगलीच भोवली. त्या अधिकाऱ्याला त्या अज्ञात महिलेने तब्बल अडीच कोटींचा गंडा घातला. एका अमेरिकन महिलेच्या जाळ्यात अडकून त्याने अडीच कोटी रुपये खर्च केले. मात्र, या बदल्यात 18 लाख अमेरिकन डॉलर हातात येण्याऐवजी त्या अधिकाऱ्याच्या हातात काळे कागद आल्याने त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. स्वप्नील धामणकर(३५) असं अधिकाऱ्याचे नाव असून मरियम खुर्शीद असं त्या अमेरिकन महिलेचं नाव आहे. कल्याणमधील ही धक्कादायक घटना आहे.

स्वप्नील धामणकर हे कल्याण येथील खडकपाडा भागात राहतात. ते मुंबईच्या थाय दूतावासात वरिष्ठ व्हिसा अधिकारी म्हणून नोकरीला आहेत. धामणकर पत्नी व दोन मुलांसह ऑगस्ट 2017 मध्ये बँकॉक येथे थायलंडला फिरायला गेले होते. कल्याणामध्ये येताच स्वप्नील यांना मरियम खुर्शीद नावाची अमेरिकन महिलेची फेसबुकवर रिक्वेस्ट आली. त्यांनी ती स्वीकारून चॅटिंगला सुरुवात केली. मरियमने माझे पती अमेरिकन सैन्यात होते. त्यांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर माझा दीर लग्नासाठी माझ्यावर जबरदस्ती करत असल्याचे सांगून त्याने मला तेहरानला बोलावले आहे. मात्र, मला तेहरानमध्ये न जाता भारतात यायचे आहे. त्यासाठी तुम्ही माझी मदत करा, अशी विनंती केली. यासोबतच माझ्या पतीने माझ्यासाठी 18 लाख डॉलर्स ठेवले आहेत. हे पैसे मला भारतीय चलनात कन्व्हर्ट करून द्या असं मरियमने सांगताच स्वप्नीलने मदत करण्याचे ठरवले.

आणि स्वप्नील यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले

डाॅलरच्या लालसेपोटी स्वप्नीलने घर गहाण ठेवून मरियमला पैसे दिले. यानंतर मरियमने भारतात येत असल्याचेही सांगितले. यावेळी तिने स्वप्नीलकडून आणखी एक लाख रुपये घेतले. इतकेच नाही तर तिने विविध बहणे पुढे करत स्वप्नीलकडून दोन कोटी 53 लाख उकळले. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे समजताच स्वप्नीलने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

त्यानेही स्वप्नीलकडून 42 लाख रुपये घेतले

ऑगस्ट 2017 मध्येच स्वप्नीलला एका व्यक्तीने फोन करून कस्टम ऑफिसर असल्याचे सांगितले. यानंतर त्याला त्याचे पार्सल असल्याचे सांगितले. या पार्सलचा टॅक्स म्हणून ६ लाख 80 हजार रुपयांची मागणी केली. हे पैसे स्वप्नीलने दिले. याच दिवशी एका नायजेरियन व्यक्तीने स्वप्नील यांच्या घरी येऊन एक बॉक्स दिला. त्यामध्ये डॉलर्सची 16 काळी बंडले होती. स्कॅनिंगमध्ये पैसे दिसू नये म्हणून बंडले काळी केल्याचे नायजेरियन व्यक्तीने स्वप्नील यांना सांगून हे काढण्यासाठी 40 लाखांचे एक लिटर केमिकल व पावडर दिली. यानंतर मरियमने पाठवलेल्या टेक्निशियनने काळी बंडले पूर्ववत करण्यासाठी नोटांचा रंग कसा काढायचा हे दाखवले. पाच नोटांचा रंग त्याने काढून दाखवला. मात्र उरलेल्या नोटा स्वप्नील यांना धुण्यास सांगितले. याबद्दल त्याने स्वप्नीलकडून 42 लाख रुपये घेतले. मात्र सदर टेक्निशन गेल्यानंतर नोटांचा रंग बदलत नसल्याने स्वप्नील यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर स्वप्नीलने तात्काळ पोलिसांची मदत घेत घडला प्रकार कथित केला.