‘ऑनलाइन’च्या विळख्यात आमदारांचीही फसवणूक!

अमरावतीः पोलीसनामा ऑनलाइन

आॅनलाइन फसवणूकीचा विळखा दिवसेदिवस वाढतचं आहे. अनेक नागरिक सध्या आॅनलाइन फसवणूकीच्या विळख्यात अलगद अडकत असून या फसवणुकीतून राज्याचे आमदार देखील सुटू शकले नाहीत. अमरावतीचे भाजपचे आमदार डाॅ. सुनिल देशमुख, गडचिरोलीचे आमदार देवराव होळी, आणि एरंडोलचे राष्ट्रवादीचे आमदार डाॅ. सतीश पाटील यांचे हजारो रुपये या टोळीने उकळले आहेत. विशेष म्हणजे, या तीन आमदारांची रक्कम एकाच खात्यात जमा झाली आहे.

”मी प्रियंका पवार बोलतेय आणि मी तुमच्याच शहरात रुक्मिणी नगर येथे राहते. आम्ही काही महिला श्रीनगरमध्ये अडकून पडल्या आहोत. येथे दंगल सुरु झाली आहे. तसेच आमचे एटीएम कार्ड मोबाईल हरवले आहे. त्यामुळे येथून बाहेर पडण्यासाठी तातडीची मदत हवी आहे. तर तुम्ही आमच्या खात्यात पैसे टाका दहा तारखेला आंम्ही अमरावतीत परत आल्यानंतर आपली रक्कम परत करतो. तसेच खात्री नसेल तर येथील ट्रॅव्हल्स एजंटशी बोला असे म्हटले.” पैसे आॅनलाइन खात्यात भरण्याचा सल्ला देखील एजंटनेच दिला होता. महिलांची अडचण ओळखून डॉ. देशमुख यांनी हैदराबादमध्ये असूनही आपल्या मुलाच्या बँक खात्यामधून नऊ हजार रुपये हस्तांतरित केले. डॉ. सुनील देशमुख यांनी अनेक दिवस उलटूनही पैसे परत करण्यासाठी संबंधित महिला न आल्याचे पाहून रुक्मिणी नगरात चौकशी केली, तेव्हा त्या पत्त्यावर प्रियंका पवार नावाची कुणीही महिला राहत नसल्याचे त्यांना समजले. तेव्हा त्यांना धक्काच बसला.