अरेच्च्या ! जीव वाचवण्यासाठी चक्क अजगराच्या पाठीवर 12 बेडूक

सिडनी : वृत्तसंस्था – जर एखाद्या सापाला बेडूक दिसला तर तो क्षणातच त्या बेडकाला गिळंकृत करेल. परंतु तुम्ही कधी असे पाहिले आहे का की एखाद्या सापाच्या किंवा अजगराच्या पाठीवर बेडून बसले आहे आणि ते सफरीचा आनंद लुटत आहे. किंवा असे चित्र कधी पाहिले आहे का की अजगर किंवा साप स्वत: बेडकांचा जीव वाचवण्यासाठी मदत करत आहे. आज आपण अशाच एका घटनेबद्दल वाचणार आहोत. सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे ज्यात एका पेक्षा जास्त बेडकं चक्क अजगराच्या पाठीवर बसले आहेत. वाचून आश्चर्य वाटत असेल ना? ही आश्चर्यकारक घटना आॅस्ट्रेलियात घडली आहे. पूरस्थिती असलेल्या ठिकाणी तब्बल बारा बेडकांनी एका छोट्या अजगराच्या पाठीचा आश्रय घेतला. त्याबाबतचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

आपत्ती काळात माणूस जसा अनोखळी माणसाची किंवा प्रसंगी दुश्मनांचीही मदत घेईल असाच काहीसा हा प्रकार म्हणावा लागेल. मुसळधार पाऊस व पूरस्थिती असलेल्या या ठिकाणी हे उभयचर प्राणी अजगराकडे मदतीसाठी धावले. ते चक्‍क त्याच्या पाठीवर चढून बसले व आपण आपली शिकार करणार्‍या जीवाच्याच शरीरावर आहोत, याची कदाचित जाणीव होऊनही ते त्याला चिकटून राहिले.

बेडकांनी ज्या अजगराचा आश्रय घेतला तो तब्बल 11 फूट लांबीचा होता. या अजगराच्या पाठीवरील बेडकांची सवारी काही लोकांनी कॅमेर्‍यात टिपून घेतली. विशेष म्हणजे हा अजगरही चांगलाच ‘अजगरवृत्ती’चा होता असे दिसते. यद‍ृच्छेने जे तोंडात पडते तेच खाऊन एरव्ही कोणताही प्रयत्न न करता शांत पडून राहायचे, याला ‘अजगरवृत्ती’ म्हणतात. कदाचित या अजगराचे पोटही भरलेले असावे, यामुळेच त्याने बेडकांना गिळून घेतले नाही.