1 ऑगस्टपासून बदलले जाणार तुमच्या पैशांसंबंधीचे ‘हे’ 5 नियम, होणार खिशावर थेट परिणाम, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : 1 ऑगस्टपासून अनेक मोठे बदल होणार आहेत. यामध्ये बर्‍याच गोष्टी स्वस्त होतील. या बदलांमध्ये बँक कर्ज, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, किमान शिल्लक शुल्क आकारणे यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच आज त्यासंबंधित जाणून घेऊया.

1. कार आणि दुचाकी खरेदी करणे होईल स्वस्त

मोटार वाहन विमा बदलल्यास पुढील महिन्यापासून नवीन कार किंवा बाईकची किंमत थोडी स्वस्त होईल. याचा कोरोना कालावधीत कोट्यावधी लोकांना फायदा होईल. इर्डाने म्हटले आहे की, दीर्घकालीन पॅकेज पॉलिसीमुळे नवीन वाहन खरेदी करणे लोकांसाठी महागडे ठरते. 1 ऑगस्ट नंतर आपल्याला नवीन कार किंवा मोटरसायकल खरेदी करायची असल्यास आपणास वाहन विम्यावर कमी पैसे खर्च करावे लागतील. भारतीय विमा नियामक विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) ‘मोटर थर्ड पार्टी’ आणि ‘ऑन डॅमेज इन्शुरन्स’ (Motor Third Party and Own Damage Insurances) संबंधित नियमांमध्ये बदल करणार आहे. आयआरडीएआयच्या सूचनेनुसार, यांनतर नवीन कार खरेदीदारांना 3 आणि 5 वर्षे कार विमा घेण्यास भाग पाडले जाणार नाही.

2. किमान शिल्लक आणि व्यवहार नियमात बदल

अनेक बँकांनी त्यांचे रोख शिल्लक आणि डिजिटल व्यवहार वाढवण्यासाठी 1 ऑगस्टपासून किमान शिल्लक शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. तसेच या बँकांमध्ये तीन विनामूल्य व्यवहारानंतर शुल्कदेखील आकारले जाईल. हे शुल्क 1 ऑगस्टपासून बँक ऑफ महाराष्ट्र, अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि आरबीएल बँकेत लागू होणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमधील बचत खातेधारकांना त्यांच्या खात्यात मेट्रो आणि शहरी भागात किमान 2 हजार रुपये ठेवणे आवश्यक आहे, जे आधी 1,500 रुपये होते. उर्वरित रक्कम 2,000 रुपयांपेक्षा कमी असल्यास बँक मेट्रो आणि शहरी भागात 75 रुपये, अर्ध-शहरी भागात 50 रुपये आणि ग्रामीण भागात दरमहा 20 रुपये आकारेल.

3. 10 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात येईल प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची रक्कम

मोदी सरकारने गरीब व दुर्बल आणि लहान धारणा असलेल्या शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पाचवा हप्ता टाकला आहे. आता 1 ऑगस्ट रोजी या योजनेंतर्गत मोदी सरकार 2000 रुपयांचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता 1 एप्रिल 2020 रोजी जाहीर करण्यात आला. ही योजना सुरू झाल्यापासून सरकारने देशातील 9.85 कोटी शेतकर्‍यांना रोख लाभ प्रदान केला आहे.

4. आरबीएल बँकेने बचत खात्याचे नियम बदलले

आरबीआयने अलीकडे बचत खात्यातील व्याज दरात बदल केला आहे. नवीन दर 1 ऑगस्टपासून लागू होतील. आता तुम्हाला 1 लाख रुपयांपर्यंतच्या बचत खात्यावर वर्षाकाठी 4.75 टक्के व्याज मिळेल. त्याचबरोबर 1-10 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 6 टक्के आणि 10 लाख ते 5 कोटी रुपयांच्या ठेवींवर 6.75 टक्के व्याज दिले जाईल. जर डेबिट कार्ड हरवले किंवा खराब झाले तर 200 रुपये शुल्क भरावे लागेल. त्याच वेळी, आता आपल्याला टायटॅनियम डेबिट कार्डसाठी दरवर्षी 250 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर ग्राहक आता महिन्यातून 5 वेळा एटीएममधून पैसे काढू शकतात.

5. ई-कॉमर्स कंपन्यांना उत्पादनाच्या मूळ देशाबद्दल माहिती द्यावी लागेल

1 ऑगस्टपासून ई-कॉमर्स कंपन्यांकडून ते पुरवित असलेले उत्पादन कुठे तयार केले जाते हे सांगणे आवश्यक असेल. परंतु बर्‍याच कंपन्यांनी आधीपासूनच ही माहिती देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मिंत्रा, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलसह अनेक कंपन्यांचा समावेश आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने (डीपीआयआयटी) बुधवारी सांगितले की सर्व ई-कॉमर्स कंपन्यांना 1 ऑगस्टपर्यंत त्यांच्या सर्व नवीन उत्पादनांच्या यादीच्या मूळ देशाबद्दल (country of origin) अपडेट करावे लागेल. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.