1 जून पासून बदलणार रेशन कार्ड संदर्भातील अनेक नियम, आता करावं लागेल ‘या’ रूल्सचं पालन, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : महत्वाकांक्षी रेशन कार्ड पोर्टेबिलिटी सेवा ‘वन नेशन-वन रेशनकार्ड’ १ जूनपासून २० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात राबविण्यात येणार आहे. ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना यावेळी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना अवलंबिण्याच्या शक्यतेवर विचार करण्यास सांगितले आहे. जेणेकरून कोरोना विषाणूच्या साथीमुळे देशात लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरित कामगार आणि लोकसंख्येच्या दुर्बल घटकांना अनुदानित धान्य मिळू शकेल. जाणून घेऊया रेशन कार्ड संबंधित महत्वाच्या गोष्टी…

१७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश जोडण्यात आले: पासवान
रामविलास पासवान म्हणाले की, आतापर्यंत १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना जोडण्यात आले आहे. त्याचबरोबर ओडिशा, मिझोरम आणि नागालँड अशी आणखी तीन राज्येही तयार यासाठी तयार होत आहेत. १ जूनपासून एकूण २० राज्ये / केंद्रशासित प्रदेश रेशन कार्ड पोर्टेबिलिटी सुरू करण्यासाठी सज्ज असतील.

आधार कार्डद्वारे होणार ओळख
या योजनेंतर्गत पीडीएस लाभार्थी त्यांच्या आधार कार्डवर इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल (पीओएस) उपकरणाद्वारे ओळखले जातील. ही योजना देशभर राबविण्यासाठी सर्व पीडीएस दुकानांवर पीओएस मशीन्स बसविण्यात येतील. पीडीएस दुकानावर राज्ये १००% पीओएस मशीनचा अहवाल देतात, त्याप्रमाणे त्यांना ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजनेत समाविष्ट केले जाईल. तसेच, ही योजना लागू झाल्यानंतर लाभार्थी देशातील कोणत्याही भागात कोणत्याही रेशन डीलरकडून त्यांच्या कार्डवर रेशन घेऊ शकतील. त्यांना जुने रेशन कार्ड सरेंडर करावे लागणार नाही, तसेच नवीन ठिकाणी नवीन रेशनकार्ड बनवावे लागणार नाही. महत्वाचे म्हणजे हे रेशन कार्ड दोन भाषांमध्ये जारी करावे लागेल. स्थानिक भाषा तसेच हिंदी किंवा इंग्रजी ही दुसरी भाषा वापरावी लागेल.

भारतातील कोणताही नागरिक रेशन कार्डसाठी करू शकतो अप्लाय
भारतातील कोणताही कायदेशीर नागरिक या रेशनकार्डसाठी अर्ज करू शकतो. १८ वर्षाखालील मुलांना त्यांच्या पालकांच्या रेशन कार्डमध्ये जोडले जाईल. या रेशन कार्ड धारकांना ३ रुपये दराने ५ किलो तांदूळ आणि २ रुपये दराने गहू मिळणार आहे.

रेशनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज करताना :
– सर्वात आधी, आपल्याला आपल्या राज्याच्या अन्न आणि रसद विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
– इथे तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे.
– यानंतर जिल्ह्याचे नाव, क्षेत्राचे नाव, शहर, ग्रामपंचायत अशी काही वैयक्तिक माहिती सांगावी लागेल.
– आता पुढे तुम्हाला कार्डचा प्रकार निवडावा लागेल. (एपीएल / बीपीएल / अंतोदय).
– पुढे आपल्याला आपल्या कुटूंब प्रमुखाचे नाव, आधार कार्ड नंबर, मतदार आयटी, बँक खाते क्रमांक, मोबाइल नंबर इत्यादी अनेक माहिती विचारली जाईल.
– सर्व माहिती भरल्यानंतर, शेवटी तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल, त्यासह तुम्हाला त्याची प्रिंट ठेवावी लागेल.