1 जून पासून बदलतायेत रेल्वे-रेशन कार्ड आणि विमान प्रवासा संदर्भातील अनेक नियम, जाणून घ्या तुमच्यावर काय होईल परिणाम

नवी दिल्ली : वृत्त संस्था –1 जूनपासून तुमच्या रोजच्या जीवनाशी संबंधीत अनेक गोष्टी बदलणार आहेत. यामध्ये रेल्वे, बस, रेशनकार्ड आणि एयरलाइन्सशी संबंधीत बदलांचा अंतर्भाव आहे. यामध्ये अनेक गोष्टी तुमच्यासाठी लॉकडाऊन नंतर सुरू होत आहेत. तर काही गोष्टी स्वस्त-महाग होत आहेत. कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी देशात अजूनही लॉकडाऊन आहे. आजपासून तुमच्या जीवनात काय बदलणार आहे, आणि तुमच्या खिशावर कोणता परिणाम होणार आहे, ते जाणून घेवूयात.

1 जूनपासून 200 गाड्या धावतील
कोरोनाव्हायरसमुळे लॉकडाऊन 4.0 मुळे देशाच्या विविध भागात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी भारतीय रेल्वे 1 जूनपासून 200 अतिरिक्त गाड्या सोडणार आहे. या 200 गाड्या नॉन एसी असतील. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. गोयल यांच्या म्हणण्यानुसार 1 जूनपासून भारतीय रेल्वे आपल्या वेळापत्रकानुसार 200 नॉन एसी गाड्या चालवणार आहे. लवकरच या गाड्यांचे बुकिंग सुरू होईल. परंतु, या गाड्याच्या ठरलेल्या तारखा व मार्गाबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.

1 जूनपासून नवीन योजना सुरू होणार आहे
केंद्र सरकार आपली महत्वाकांक्षी योजना ’वन नेशन, वन रेशन कार्ड’ येत्या 1 जूनपासून देशभरातील 20 राज्यात लागू करणार आहे. यानंतर या 20 राज्यांमधील रेशनकार्डधारक कोणत्याही राज्यातील शासकीय शिधा केंद्रातून रेशन खरेदी करू शकतील. केंद्र सरकारच्या या योजनेमुळे मोठ्या संख्येने गरीब लोकांना अत्यंत कमी किंमतीत धान्य मिळणार आहे.

उत्तर प्रदेश रोडवेज 1 जूनपासून धावणार
उत्तर प्रदेश रोडवेज व्यवस्थापनाने 1 जूनपासून बसेस चालविण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. कोणत्याही परिस्थितीत बस सुस्थितीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डेपोनिहाय कामही सुरू झाले आहे. बसेसचे संचालन करताना सर्व नियमांचे पालन करण्याची जबाबदारी बस स्थानक प्रमुख तसेच चालक-वाहक यांची असेल. मास्क घातलेल्या व्यक्तींनाच बसच्या आवारात प्रवेश करण्याची परवानगी असेल. कंडक्टरच्या सीटसमोर बसमध्ये सॅनिटायझरची बाटली असेल. प्रवाशांनी सॅनिटायझर वापरल्यानंतर त्यांना आत प्रवेश मिळेल. कंडक्टर आणि ड्रायव्हरला स्वतंत्र सॅनिटायझरची बाटली मिळेल. बसच्या क्षमतेच्या निम्मेच प्रवासी प्रवास करतील. साधारणत: 60 सीटर बसवर 30 प्रवासी बसतील.

सुरू होत आहेत गोएअर विमाने
सरकारच्या सूचना व नियमांचे पालन करत गोएअर 1 जूनपासून देशांतर्गत उड्डाणे सुरू करणार आहे. नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी बुधवारी ट्विटरवर जाहीर केले की 25 मे पासून देशांतर्गत प्रवासी उड्डाणे सुरू होतील, परंतु यासाठी प्रवासी आणि विमान कंपन्यांना काही नियमांचे पालन करावे लागेल. गोएअर वगळता एअर इंडियासह सर्व भारतीय विमान कंपन्यांनी शुक्रवारपासून देशांतर्गत उड्डाणांसाठी बुकिंग सुरू केली आहे.

महाग होऊ शकते पेट्रोल
लॉकडाऊन 4.0 शिथिल केले गेले आहे. अनेक राज्यांनी सार्वजनिक आणि खासगी वाहतूक सुरू केली आहे, ज्यामुळे इंधनाची मागणी वाढली आहे. एप्रिलमध्ये लॉकडाऊनमुळे देशभरातील सार्वजनिक आणि खासगी वाहतुकीवर बंदी आल्यामुळे इंधनाच्या मागणीत विक्रमी घट झाली होती. मागच्या काही दिवसात अनेक राज्यांनी व्हॅट वाढवून पेट्रोल महाग केले होते. आता या यादीमध्ये आणखी एक राज्य आहे जेथे 1 जूनपासून पेट्रोल आणि डिझेल महाग होईल. मिझोरम सरकारने 1 जूनपासून पेट्रोलवरील 2.5 टक्के व डिझेलवर 5 टक्के व्हॅट वाढविण्याची घोषणा केली आहे, यामुळे येथे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढणार आहेत.