पिंपरी-चिंचवडची बेस्ट सिटीवरून डर्टी सिटीकडे वाटचाल

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१९ चा आज निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराने देशात ५२ वा आणि राज्यात १३ वा क्रमांक मिळवला आहे. २०१८ मध्ये शहराचा देशात ४३ वा तर राज्यात ६ वा क्रमांक होता. म्हणजेच स्वच्छ सर्वेक्षण मध्ये पिंपरी-चिंचवड यंदा पिछाडीवर पडले आहे. यावरून शहराची बेस्ट सिटीवरून डर्टी सिटीकडे वाटचाल सुरु झाली आहे.

केंद्र शासनाच्या पथकामार्फत जानेवारी महिन्यात शहरात सर्वेक्षण दरम्याण पिंपरी-चिंचवड महापालिकेने जय्यत तयारी केली होती. यंदा प्रथमच खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्या माध्यमातून जनजागृती, मोबाईल अ‍ॅप डाउनलोड, घरोघरी जाऊन माहिती देणे आदी उपक्रम हाती घेण्यात आले होते. ऐवढ्या मोठ्या प्रमाणात मेहनत घेऊनही पिंपरी-चिंचवड शहराचे स्थान पिछाडीवर पडले आहे. गेल्या वर्षी हे स्थान ४३ व्या होते. सन २०१७ ला शहर ७२ व्या स्थानी फेकले गेले होते. तर, पहिल्या वर्षी सन २०१६ ला शहराने देशात ९ वा क्रमांक प्राप्त केला होता.

दरम्यान, या सर्वेक्षणात मध्य प्रदेशच्या इंदौर शहराने सलग तिसर्‍या वर्षी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. नवी मुंबईने ७ वे स्थान मिळविले आहे. पुणे शहरही यंदा ३७ व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. प्रथम दहामध्ये हे राज्यातील एकमेव शहर आहे. कोल्हापूर (१६), मीर भाईदर (२७), चंद्रपूर (२९), अंबरनाथ (३०), वर्धा (३४), वाशी विरार (३६), पुणे (३७), लातूर (३८), सातारा (४५), बृहमुंबई (४९), कुलगाव बदलापूर (५१), पिंपरी-चिंचवड (५२) , उदगीर (५३), सोलापूर (५४), बार्शी (५५), ठाणे (५७), नागपूर (५८), नांदेड वाघेला  (६०), नाशिक (६७) या २० शहरांनी १०० शहरात स्थान मिळविले आहे.