सेनेकडून मावळात आप्पा तर शिरूरमधून दादांना उमेदवारी निश्चित 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे (आप्पा) आणि शिरूर मतदार संघाचे शिवाजीराव आढळराव- पाटील (दादा) यांचे संसदेतील काम अतिशय चांगले आहे. लोकमानसात मिसळून त्यांची कामे केलेले हे दोन खासदार आहेत. दोघांनीही जनतेच्या अनेक प्रश्नांना संसदेत वाचा फोडली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी बारणे आणि आढळराव-पाटील यांना निश्चित असल्याचेही स्पष्ट करत कार्यकर्त्यांना आत्तापासूनच कामाला लागण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत.

[amazon_link asins=’B01GK84DS0′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a045f941-87e9-11e8-84e9-8bdc95d9c548′]

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील पदाधिका-यांशी संवाद साधण्यासाठी उध्दव ठाकरे शनिवारी पुणे दौ-यावर आहेत. पुणे जिल्हा, ग्रामीणअंतर्गत येणा-या लोकसभा, विधानसभा मतदार संघानिहाय ते आढावा घेत आहेत.  मावळ लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक दुपारी पार पडली. या बैठकीला मावळ मतदार संघात येणा-या सहाही विधानसभा मतदार संघातील जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, विभागप्रमुखांसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला सुरुवात करावी. बुथप्रमुख नेमावेत. निवडणुकीचे नियोजन करावे. यंत्रणा सक्षम करावी. त्यामुळे निवडणूक अधिक सोपी होईल. मावळात शिवसेनेचे वर्चस्व आहे. आणखीन ताकद घट्ट करा. मावळातून शिवसेनेचा सलग दोनदा खासदार निवडून आला आहे. आता हॅटट्रिक करायची असून त्यासाठी तन आणि मनाने कामाला सुरुवात करण्याच्या सूचना ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

खासदार श्रीरंग बारणे यांचे मतदार संघात काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरु आहे. जनतेमध्ये मिसळणारा आणि त्यांची कामे मार्गी लावणार खासदार अशी त्यांची ख्याती आहे. लोकसभेत प्रथमच निवडून येऊनही त्यांनी प्रश्न विचारण्यांचा उच्चांक गाठला आहे. त्यांना सलग चार वेळा उत्कृष्ट संसद पटूचा पुरुस्कार मिळाला आहे, असे सांगत उध्दव ठाकरे यांनी बारणे यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची उमेदवारी खासदार बारणेच असणार हे आता निश्चित झाले आहे.

ठाकरे यांनी शिरुर लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला.  थेऊर येथील साखर कारखाना आणि शेतक-यांच्या जिव्हाळ्याचा बैलगाडा शर्यतीचा प्रश्नांसह प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मी स्वत:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील वरिष्ठ मंत्र्यांशी बोलतो असे म्हणत ठाकरे यांनी आढळराव यांच्या कामाचे कौतुक केले. आढळराव यांच्या विरोधात शिरुर लोकसभा मतदार संघात तुल्यबळ उमेदवार नाही. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असून हडपसर, भोसरी, जुन्नर विधानसभा मतदार संघावर देखील शिवसेनेचा भगवा फडकू शकतो. त्यादृष्टीने कामाला लागा असे निर्देशही ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

शिरुर मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव हेच असणार आहेत, हे आता निश्चित झाले आहे. आढळराव चौथ्यांदा लोकसभा लढविणार आहेत.