यवतमाळ : 5 वर्षाच्या मुलासमोर झोपेतच पत्नीचा चाकूने भोसकून खून, पती गजाआड

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – 5 वर्षाच्या मुलासमोरच पतीने झोपेतच पत्नीचा चाकूने भोसकून व नंतर गळा आवळून खून केला. बुधवारी (दि. 10) पहाटे ही धक्कादायक घटना घडली. यवतमावळ येथील शिवाजीनगर सारख्या उच्चभ्रू वस्तीत ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

मेघना रविराज चौधरी ( वय 30, रा. पिंपळगाव. पुसद ) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिचा पती रविराज रमेश चौधरी (वय 35) याला अटक केली आहे.

अवधूतवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघना ही पती रविराज याच्यासह यवतमाळ येथील शिवाजीनगर येथे राहणा-या नंणदेच्या घरी आली होती. आरोपी रविराज चौधरी याचा दोन महिन्यापूर्वी अपघात झाला होता. त्यात त्याच्या डोक्याला इजा झाली होती. त्यासाठी त्याच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. त्याच्याच अनुषंगाने चौधरी दाम्पत्य बहीण जावई उमेश ठाकरे यांच्याकडे आले होते. बुधवारी मध्यरात्री मेघना पती रविराज व पाच वर्षाचा मुलगा अगस्त्य हे एका खोलीत झोपले होते. मध्यरात्रीनंतर आरोपी रविराजने पत्नीला झोपेतच चाकूने भोसकले. तिच्या पाठीवर, हातावर व पोटावर चाकूने वार केेले. नंतर तिचा गळा आवळून खून केला. ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. उमेश ठाकरे यांनी घटनेची माहिती अवधूतवाडी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी रविराजला अटक केली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण करीत आहे.