चांगला निर्णय ! शाळा परिसराच्या 50 मीटरच्या परिघात नाही होवू शकणार जंक फूडची विक्री : Fssai

नवी दिल्ली : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) चे सीईओ अरुण सिंघल यांनी शाळा आणि अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये जंक फूड आणि धोकादायक खाद्य पदार्थांच्या विक्रीवर प्रतिबंध लावला आहे.

सोबतच एफएसएसएआयने शाळांच्या परिसरात 50 मीटरच्या परिघात धोकादायक खाद्य पदार्थांची विक्री आणि जाहिरातीवर प्रतिबंध लावला आहे. हे पाऊल शाळकरी मुलांची सुरक्षा आणि पौष्टिक जेवणाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी उचलण्यात आले आहे. यासाठी एफएसएसएआय अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यांतर्गत नवीन नियम लागू करत आहे.

एफएसएसएआयच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले की, यामुळे शाळांमध्ये मुलांसाठी सुरक्षित आणि संतुलित आहार उपलब्ध होईल. ज्या खाद्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात फॅट, मीठ आणि साखर आहे, ते पदार्थ शाळा कँटीन, मेस किंवा शाळेच्या परिसरात 50 मीटरच्या अंतरापर्यंत विकता येणार नाही. यामध्ये पिझ्झा, बर्गर, कोल्ड ड्रिंक, चिप्स, फ्रेंच फ्राइज, समोसे, पेस्ट्री, सँडविच, ब्रेड पकोडे इत्यादी पदार्थांचा समावेश होतो.

2015 मध्ये दिल्ली हायकोर्टाने शाळांच्या कँटीनमध्ये जंक फूडच्या विक्रीबाबत नियम बनवण्याचे आदेश एफएसएसएआयला दिले होते. यानंतर प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीने शाळेत मुलांसाठी आरोग्यदाखी जेवण उपलब्ध करण्यासाठी नवे दिशानिर्देश तयार केले आहेत.

शाळा कँटीनला लायसन्स आवश्यक
अधिकार्‍याने म्हटले की, शाळेत कँटीन, मेस, किचन चालवणार्‍यांना एफएसएसएआय लायसन्स घ्यावे लागेल. सोबतच शिक्षण विभागाद्वारे मीड डे मील बनवणार्‍या संस्थाना सुद्धा एफएसएसएआयमध्ये नोंदणी करावी लागेल किंवा लायसन्स घ्यावे लागेल. महापालिकेचे अधिकारी आणि राज्य प्रशासनाकडून नियमित तपासणी सुद्धा केली जाईल.