FTII: संपकरी विद्यार्थ्यांना CID अधिकाऱ्याचा दणका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अनुपम खेर यांच्या राजिनाम्यानंतर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) अध्यपदी नियुक्त झालेले बी.पी. सिंग यांनी संप करणाऱ्या विद्यर्थ्यांना दणका दिला आहे. प्रत्येकवेळी विविध मागण्यासाठी संपाचे हत्यार उपसणाऱ्या आणि वर्गातून निघून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे संपाची किंमत मोजावी लागणार आहे.

संप करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सुट्ट्यांद्वारे या संपाची किंमत मोजावी लागणार आहे. संस्थेच्या विद्या परिषदेच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून, याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात आली आहे. तसेच उशिरा फि भरणाऱ्या विद्यार्थ्यांकडून देखील दंड आकारण्यात येणार आहे.

अध्यपदाची सुत्रे हाती घेताच बी.पी. सिंग यांनी संस्थेच्या शिस्तीबाबत कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचा भाग म्हणून संप करणाऱ्या आणि वर्गातून निघून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बुडालेल्या दिवसांची भरपाई त्यांच्या हक्काच्या सुट्ट्यांमधून करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना नियमानुसारच आपली उपस्थिती यापुढे ठेवावी लागणार, हे यामुळे स्पष्ट झाले आहे.

संस्थेच्या विद्या परिषदेची बैठक तब्बल पावणेदोन वर्षांनी झाल्यामुळे त्यात अनेक प्रलंबित विषयांवर चर्चा होणे अपेक्षित होते आणि झालेही तसेच. यात प्रामुख्याने अभ्यासक्रमात अपेक्षित असणारे महत्त्वाचे बदल, विद्यार्थ्यांना असलेल्या शैक्षणिक समस्या, संस्थेतील शिस्त आणि दैनंदिन कामकाजाचे विविध विषय चर्चिले गेले. सुमारे आठ तास ही बैठक सुरू होती. या बैठकीमुळे खेर यांच्या काळात प्रलंबित राहिलेल्या अनेक गोष्टींची पूर्तता होणे शक्य असल्याचे मानले जात आहे.