वाहनचालकांना दिलासा ! ‘पेट्रोल-डिझेल’च्या दरात कपात, जाणून घ्या दर

पुणे : जागतिक बाजारपेठेमध्ये क्रुड  ऑईलचे दर कमी झाल्याने त्याचा प्रथमच ग्राहकांना थेट फायदा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यामुळे गेल्या काही दिवसात पेट्रोल व डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा घट झाली आहे.

यापूर्वी २७ फेब्रुवारीपर्यंत दररोज पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत होती. त्यानंतर ही भाववाढ थांबवून ठेवण्यात आली. जागतिक बाजारपेठेत क्रुड ऑईलचे दर १० डॉलरने कमी झाले. त्यामुळे आज पेट्रोल व डिझेलच्या दरात २१ पैशांनी घट झाली आहे. पुण्यात आज पेट्रोलचा दर ९६.८१ रुपये प्रति लिटर असणार आहे. डिझेल प्रति लिटर ८६,४९ रुपये राहणार आहे. तर पॉवर पेट्रोल १००.५० रुपये असेल.

लॉकडाऊनच्या काळात इंधनाचा वापर कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाचे दर गडगडले होते. मात्र, त्याचवेळी केंद्र सरकारचा महसुल कमी झाल्याने सरकारने इंधनावरील करात वाढ केल्याने जागतिक बाजारपेठेतील दर कमी झाले. तरी त्याचा फायदा सामान्य ग्राहकांना मिळाला नव्हता.

परंतु, आता पाच राज्यात निवडणुका असल्याने अगोदरच केंद्र सरकारने इंधनाच्या दरातील भाववाढ रोखून धरली होती. त्यात जागतिक बाजारातील दरात घट झाल्याने त्याचा फायदा तातडीने सामान्यांपर्यंत पोहचविण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरात घट झाली आहे.