सोलापूर-धुळे महामार्गावर इंधनाच्या टँकरच्या स्फोटात ड्रायव्हरचा होरपळून मृत्यू

बीड : पोलिसनामा ऑनलाइन – सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरती इंधनाच्या टॅंकरचा भीषण अपघात झाला आहे. यात टॅंकरचा स्फोट झाल्याने ड्रायव्हरचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा घाटात बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास सोलापूर-धुळे महामार्गावरती इंधनाचा टँकर पलटी झाला. इंधनाचा टँकर असल्याने त्याने पलटी होताच पेट घेतला. त्यावेळी इंधनाचा स्फोट झाला यामध्ये ड्रायव्हरचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर एक जण गंभीर भाजला असून, त्याला तातडीने बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. स्फोटानंतर आगीचे आणि धुराचे लोट आकाशात मोठ्या प्रमाणात परसल्याने साधारण ते २ किलोमीटर वरून दिसत होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेऊन आगीवरती नियंत्रण मिळवलं. ऐन घाटात हा प्रकार घडल्यामुळे काहीकाळ वाहतुकीवर परिणाम झाल्याचं दिसलं.

अग्निशामक दलाचे जवान आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मात्र, यात ड्रायव्हरचा भाजून अक्षरशः कोळसा झाला असून, एक जण गंभीर आहे. तर मृत व्यक्तीची अद्यापही ओळख पटलेली नाही.