Pune : ब्राह्मण कवयित्रीवर मुस्लिमांकडून अंत्यसंस्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रसिद्ध अंध कवयित्री आणि सामाजिक कार्य करणार्‍या डॉ. प्रतिभा मोरेश्वर भोळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. मात्र, कोरोना कालावधीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणेदेखील दुरापास्त झाले होते. अशा वेळेला माणुसकीच्या दृष्टिकोनातून मूलनिवासी मुस्लीम मंच या संस्थेच्या मुस्लीम पदाधिकार्‍यांनी अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारून हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले

मराठी सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत मानाचे स्थान असणार्‍या ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांच्या नात असणार्‍या प्रतिभा या अंध असल्यामुळे साहित्य क्षेत्रात मोठा संघर्ष करावा लागला होता. तरी देखील प्रतिभा आणि सातत्याच्या जोरावर त्यांनीही कवयित्री म्हणून त्यांनी मोठे नाव कमावले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत शासकीय व खासगी संस्थांमार्फत विविध स्वरुपाचे पुरस्कार मिळालेले आहेत. अत्यंत मोठा मित्र परिवार व नातेसंबंधातील गोतावळा असतानाही अखेरच्या क्षणी मात्र त्यांच्या पतीशिवाय कोणी सोबत राहिले नाही. पत्नी मेल्याचे दुःख असताना अंतिम संस्कार करण्यासाठी जवळचे मित्र व नातेवाईक कोणीही उपलब्ध नसल्यामुळे भोळे यांचे पती सुनील परमार यांनी मूलनिवासी मुस्लीम मंचाच्या पदाधिकार्‍यांशी संपर्क साधाला. त्यानंतर त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले. मूलनिवासी मुस्लीम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार व त्यांचे सहकारी साबीर शेख तोपखाना, झमीर मोमिन, मोलाना शकिल शेख, साबीर सय्यद, दानिश खान, अमजद शेख यावेळी उपस्थित होते.