..जन्मदात्या आई बरोबर पाच वर्षाच्या चिमुकल्यावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार

निगडी : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे-सोलापूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पिंपरी-चिंचवड मधील गायकवाड कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता डाळज गावाजवळ घडली. मयत व्यक्तींना निगडी येथील निवस्थानी आज सकाळी आणण्यात आले. त्यांच्यावर शोकसागरात स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी आईसह पाच वर्षीय चिमुकल्यावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे उपस्थितांमधील अनेकांचा भावनांचा बांध फुटला.

सविस्तर माहिती अशी की, प्रकाश रामचंद्र गायकवाड (६७) ,सुनिता प्रकाश गायकवाड (५८),संदीप प्रकाश गायकवाड (४०),शितल संदीप गायकवाड (३२),अभिराज संदीप गायकवाड (५) सर्व रा. नाना-नानी पार्क यमुनानगर निगडी अशी अपघातात मयत व्यक्तींची नावे आहेत. तर प्रमोद प्रकाश गायकवाड (३०) आणि हेमलता प्रमोद गायकवाड (२८) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

तुळजाभवानी मातेच्या दर्शनाहून पुण्याकडे परत येत असताना डाळज गावाजवळ स्कारपीओ क्रमांक एम.एच २० ए.जी ९३९ या मोटारीचे अचानक टायर फुटल्याने वाहनचालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटले आणि मोटारीने पलटी घेत दुसऱ्या लेनवरील विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारीला जाऊन जोरात आदळली, यात गायकवाड कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. दरम्यान या अपघातात आई आणि पाच वर्षीय अभिराज संदीप गायकवाड याचा दुर्दैवी मृत्यू आहे.अपघात एवढा भीषण होता की,मोटारीचा चक्काचूर झाला होता.गायकवाड कुटुंबातील ३ वर्षीय विश्वराज हा आपल्या मामाच्या गावी गेल्याने बचावला आहे.त्याच्या शाळेला सुट्ट्या लागल्याने तो मामाच्या गावी गेला होता. या घटनेमुळे निगडी, यमुनानगर परिसरात शोकसागरात असून सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत.