दुर्देवी ! महाराष्ट्रात कोरोनाचा कहर; ‘या’ जिल्हयात 8 जणांना एकाचवेळी ठेवलं ‘सरणा’वर अन् केले अंत्यसंस्कार

बीडः पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी कोरोनाचे 55 हजार 469 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 297 रुग्ण दगावल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे. अशातच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 8 जणांवर एकाच सरणावर अंत्यविधी करण्यात आला. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश असून सर्व रुग्ण 60 वर्षांपुढील आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्याकडून कठोर निर्बंध लावले आहेत. मात्र, अजूनही कोरोनाचा संसर्ग रोखण्यास शासनाला यश येताना दिसत नाही. अंबाजोगाई येथे मंगळवारी (दि. 6) कोरोनामुळे 8 रुग्णांचा मृत्यू झाला होता. यापैकी सात रुग्ण हे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील असून एक रुग्ण सावरगाव कोविड सेंटरमधील आहे.

या आठ जणांवर एकाच सरणावर अंत्यविधी करण्याची वेळ नगरपालिका प्रशासनावर आली. नगरपालिकेच्या पथकाने एकाच रुग्णवाहिकेतून हे 8 ही मृत्यदेह स्मशानभूमीत आणले. त्यानंतर एकाच सरणावर आठ मृतदेह ठेवून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतांच्या दोन नातेवाईकांना यावेळी पीपीई कीट घालून उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती.