‘फुन्सुक वांगडू’ने गाडीलाच बनवले घराचे छप्पर, महिंद्राच्या सीईओंनी केला फोटो शेअर 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही सर्वांनीच ‘थ्री इडियटस्’ चित्रपट पाहिला असेल. त्यातील अमीर खानची भूमिका सर्वांनाच आवडली होती. परंतु  आमीर खानने साकारलेली फुन्सुक वांगडू ही भूमिका कोणाच्या जीवनावर आधारीत आहे हे तुम्हाला माहीत आहे का ? कादाचित तुम्हाला माहीत नसेल परंतु फुन्सुक वांगडू ही भूमिका लडाखमधील संशोधक व इंजिनिअर सोनम वांगचूक यांच्यावर आधारित होती. आता त्यांनी एका घराला चक्‍क गाडीचे छत बनवल्याचे समोर आले आहे. महिंद्रा कंपनीचे सीईओ आनंद महिंद्रा यांनी या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याचे समोर आले आहे. सोनम वांगचूक यांनी तयार केलेला बर्फाचा पिरॅमिड प्रसिद्ध आहे. लडाखमधील लोकांना उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये यासाठी त्यांनी ही उपाययोजना केली होती.

लोकांचे जीवन सुखकर करण्यासाठी वैज्ञानिक मार्गाने ते नेहमीच प्रयत्न करत असतात. मुख्य म्हणजे वांगचूक हे लडाखमध्ये हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह ही संस्था चालवतात. यामार्फतच ते लोकांसाठी काम करतात. ते अनेक टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवतात. महिंद्राच्या गाडीचं जे छत त्यांनी बनवलं आहे हे त्यातीलच एक उदाहरण आहे.

ट्विटमध्ये काय म्हणाले आनंद महिंद्रा ?
दरम्यान  महिंद्रा यांनी वांगचूक यांनी  बनवलेल्या घराचे फोटो ट्विट केले होते. यात त्यांनी म्हटलं की, “माझे मित्र सोनम वांगचूक यांनी हे फोटो माझ्याशी शेअर केले. त्यांनी रिसायकल महिंद्रा गाडीच्या सहाय्याने एका घराचे छत बनवले आहे. त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये कोणतीही गोष्ट वाया घालवली जात नाही. त्यामुळेच या जुन्या गाडीचाही त्यांनी असा वापर केला! सोशल मीडियात या फोटोची आणि कल्पनेची प्रशंसा केली जात आहे. ही गाडी घरावर अशा पद्धतीने बसवली आहे की, जणू काही वाटावे की ही गाडी घरावर चढून गेली आहे.”