FWICE ची राम गोपाल वर्मांवर बंदी ! कामगारांचा 1.25 कोटी रुपये पगार न दिल्याचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील दिग्गज प्रोडेयुसर, डायरेक्टर राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) हे भविष्यात कुठेही शुटींग करोत, फेडरेशनच्या 32 युनियनपैकी कोणत्याही युनियनचा एकही सदस्य त्यांच्यासोबत काम करणार नाही असा निर्णय फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) नं एका बैठकीत घेतला आहे. राम गोपल वर्मा यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित कलाकार, टेक्निशियन आणि वर्कर्स यांचे जवळपास सव्वाकोटी म्हणजेच 1.25 कोटी रुपयांहून अधिकची थकीत देय रक्कम दिलेली नाही.

फेडरेशनचे प्रेसिडेंट बीएन तिवारी, जनरल सेक्रेटरी अशोक दुबे आणि ट्रेजरार गंगेश्वरलाल श्रीवास्तव (संजू भाई) यांच्या नुसार, आम्ही या प्रकरणी त्यांना पूर्वीच लीगल नोटीस पाठवली आहे. परंतु वर्मांनी मात्र टेक्निशियन आणि वर्कर्स यांना रक्कमही दिली नाही आणि आमच्या पत्राला अचूक उत्तरही दिलं नाही.

एफडब्ल्युआयसीई कडून राम गोपाल वर्मा यांना 17 सप्टेंबर 2020 रोजी पत्र लिहून त्या टेक्निशियनची संपूर्ण यादी आणि थकीत देय रक्कम यांचा तपशिल देण्यात आला होता. एफडब्ल्युआयसीईनं अनेकदा या प्रकरणी वर्मांना पत्रही लिहिलं. परंतु त्यांनी पत्र घेण्यास नकार दिला.

बीएन तिवारी यांच्यानुसार, आम्हाला मध्यंतरी असं कळालं की, कोरोना काळातही राम गोपाल वर्मा आपल्या एका प्रोजेक्टची शुटींग करत आहेत. या प्रकरणी आम्ही 10 सप्टेंबर 2020 रोजी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. आमची अशी इच्छा होती की, राम गोपाल वर्मा यांनी गरीब टेक्निशियन, कलाकार आणि वर्कर्स यांना थकित देय रक्कम अदा करावी. परंतु वर्मांनी मात्र या दिशेनं कोणतंही पाऊल टाकलं नाही. यानंतर नाविलाजानं आम्हाला भविष्यात त्यांच्या सोबत काम न करण्याचा निर्णय घ्यावा लागला. इम्पा आणि गिल्ड यांच्या सोबतच इतर सर्व प्रमुख युनियनला याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

राम यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी सत्या, रंगीला, आग, कंपनी, सरकार, नि:शब्द, भूत, दौड अशा अनेक चर्चित सिनेमांचं डायरेक्शन केलं आहे. त्यांनी यापैकी बहुतेक सिनेमांची निर्मितीही केली आहे.