खोब्रामेंढा जंगलात झालेल्या चकमकीत 5 माओवाद्यांचा खात्मा

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाईन –  गडचिरोली येथील कुरखेडा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीच्या खोब्रामेंढा जंगलात सोमवारी (दि. 29) सकाळी झालेल्या चकमकीत 5 माओवादी ठार झाले. मृतामध्ये 3 पुरूष आणि 2 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे.

खोब्रामेंढा जंगलात शनिवारपासून पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आतापर्यंत दोन चकमकी झाल्या आहे. शनिवारी सुमारे एक ते दीड तास चाललेल्या या चकमकीत पोलिसांचा वाढता दबाव पाहून, नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. या चकमकीनंतर घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचे साहित्य जप्त केले आहे. त्यानंतर सोमवारी (दि. 29) सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास झालेल्या चकमकीत 5 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिलेेल्या माहितीनुसार, गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा झाला असून, तीन पुरुष आणि दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.