‘ग्रीन झोन’मधील गडचिरोली गेला ‘रेड झोन’मध्ये, एकाच दिवशी ‘एवढे’ नवीन रुग्ण

गडचिरोली : वृत्त संस्था  – राज्यातील सर्वाधिक काळ ग्रीन झोनमध्ये राहिलेला जिल्हा म्हणून ओळखल्या गेलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता २५ झाली असून तो केवळ ८ दिवसात रेड झोनमध्ये गेला आहे. सोमवारी एटीपल्ली तालुक्यात ९ तर भामरागड तालुक्यातील एक असे १० नवीन रुग्ण सापडले. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता २५ झाली आहे.

बरोबर गडचिरोलीच्या दक्षिण भागातील तीन तालुक्यात कोरोनाने शिरकाव केल्याने आरोग्य विभागासमोरील आव्हान वाढले आहे. जिल्ह्यातील सर्व रुग्ण हे मुंबई, पुण्यातून आलेले आहेत.
सर्वाधिक काळ ग्रीन झोनमध्ये असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सोमवारी १८ मे रोजी प्रथमच ५ कोरोना बाधितांची नोंद झाली होती. ते सर्व जण बाहेरुन जिल्ह्यात आले होते. पुणे, मुंबईत ते मजूर म्हणून गेले होते. अनेक जण पायी चालत आल्याने प्रशासनाला माहिती न देता आपल्या घरी पोहचले होते. हे समजल्यावर त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले व त्यांची तपासणी करण्यात आली. तेव्हा ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

त्यामुळे या सर्वांच्या संपर्कात आलेल्या तब्बल १२५९ संभावित रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ६८७ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. अजून ५१३ जणाचे अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे अजून किती जण पॉझिटिव्ह येतील, यावर जिल्ह्यात कोरोनाचा किती फैलाव झाला आहे, हे स्पष्ट होणार आहे.