रुग्णवाहिके अभावी ‘त्या’ दाम्पत्याचे दहा वर्षांपासूनचे स्वप्न भंगले

गडचिरोली :वृत्तसंस्था
देश खूप पुढे गेला आहे, प्रगती झाली आहे अशी ग्वाही देणाऱ्यानी जरा राज्यातील दुर्गम भागात जाऊन पाहावे कुठे रुग्नावाहिके अभावी मृतदेह खांद्यावरून नेल्याच्या घटना आहेत तर कुठे रुग्णवाहिके अभावी गर्भवाटे महिला दगावल्याच्या घटना आहेत. राज्यात मदतीला येणारी म्हणून क्रमांक १०८ रुग्नावाहिका प्रसिद्ध आहे पण गडचिरोली जिल्ह्यातील ताटीगुडम या अतिदुर्गम भागात राहणाऱ्या दाम्पत्यांच्या मात्र मदतीला टी येऊ शकली नाही. या दाम्पत्याला दहा वर्षांनी झालेल्या बाळाला ही रुग्नावाहिका वाचवू शकली नाही. अहेरी तालुक्यातील ताटीगुडम या गावातील बाळ रुग्णवाहिके अभावी दगावले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील ताटीगुडम या अतिदुर्गम गावातील ‘विनोदा पेंदाम’ यांना शुक्रवारी प्रसूतिवेदना झाल्या. गावातील ‘आशा’चे काम पाहणाऱ्या सरिता यांनी कमलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ राजेश मानकर यांना संपर्क साधला आणि रुग्नावाहिकेची मागणी केली पण वेळेवर रुग्णवाहिका ताटीगुडम येथे पोहोचली नाही.

दरम्यान शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता विनोदाची घरीच प्रसूती झाली. बाळ पहिल्या दिवशी ठीक होते मात्र दुसऱ्या दिवशी बाळाची प्रकृती बिघडली. त्यामुळे आशा यांनी पुन्हा रुग्णवाहिकेसाठी संपर्क केला. शनिवारी देखील रूग्णवाहिका उपलब्ध नव्हती. अखेर शनिवारी संध्याकाळी १०८ ची रुग्णवाहिका ताटीगुडम येथे पोहोचली पण बाळ घेऊन जात असतानाच बाळाने प्राण सोडले. उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाळाला मृत घोषित केले. आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे दहा वर्षांनी झालेले बाळ दगावले.

रुग्नवाहिका का पोहचली नाही याची चौकशी केली असता ,कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक रुग्णवाहिका बंद आहे. त्यामुळे भाडे तत्त्वावर दुसरी रुग्णवाहिका घेण्यात आली आहे. ही दुसरी रुग्णवाहिका एका डॉक्टरने खाजगी कामासाठी नेल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध करुन देता आली नाही. अशी माहिती मिळाली. या प्रकरणामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.