नवी दिल्ली : वृत्त संस्था – लहान मुलं असो की तरूण-तरूणी, सर्वांनाच टिकटॉकने वेड लावलं आहे. विशेष म्हणजे शहरी भागात ग्रामीण भागातही याचे फॅड प्रचंड वाढले आहे. परंतु, अलिकडे याचे अनेक दुष्परिणाम समोर येऊ लागल्याने पालकांची चिंता वाढली आहे. मात्र, यावर टिकटॉकनेच एक मार्ग शोधला असून मुलं टिकटॉकवर नेमकं काय करत आहेत, हे आता पालकांना समजणार आहे. थोडक्यात टिकटॉकवर पालकांचा कंट्रोल असणार आहे.
शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्मवरील टिकटॉकने मुलांचा विचार करून नवे फीचर आणले आहे. आपला मुलगा किंवा मुलगी टिकटॉकवर कोणता व्हिडिओ करणार आहेत याची माहिती आता पालकांना त्यांच्या मोबाईलवर आधीच कळू शकणार आहे. या फीचरचे नाव फॅमिली सेफ्टी असे आहे. हे फीचर पालकांच्या अकाउंट्सला लिंक असल्याने पालकांना मुलांच्या टिकटॉकची माहिती आधीच समजणार आहे.
फॅमिली सेफ्टी मोडची घोषणा करताना टिकटॉकने म्हटले आहे की, टिकटॉकवरील अनुभव गंमतशीर, स्पष्ट आणि सुरक्षित असतो. आम्ही युजर्संना येथे चांगला व सुरक्षित अनुभव देणार आहोत. म्हणूच हे नवे फीचर आणले आहे. या फीचरद्वारे पालक अल्पवयीन मुला-मुलीच्या टिकटॉकवर कंट्रोल ठेवू शकतील. भारतात टिकटॉकचे लाखो युजर्स आहेत. यामध्ये अल्पवयीन मुला-मुलींचीही मोठी संख्या आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी टिकटॉकने हे पाऊल उचलले आहे.
अॅप अॅनीच्या माहितीनुसार, अँड्रॉयड युजर्सने 2018 मध्ये एकूण 900 मिलियन (9 कोटी) तास टिकटॉकवर घालवले आहेत. ही वाढ आश्चर्यकारक आणि चिंताजनकही आहे. टिकटॉकने याबाबतीत फेसबुकलाही मागे टाकले आहे. भारतीय युजर्सने टिकटॉकवर 2018 सालच्या तुलनेत 6 पट अधिक वेळ घालवला आहे. 2019 मध्ये भारतीयांनी 5.5 अब्ज तास टिकटॉकवर घालवला आहे.