सावधान ! Google Play Store : ‘या’ 6 अ‍ॅप्सवरील युजर्सचा डेटा लीक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल सर्वचजण स्मार्टफोन वापरतात. अनेक वेगवेगळे अ‍ॅप्स ते इन्स्टाॅल करतात. परंतु अनेकदा अशा अ‍ॅपमधून डेटा लीक होण्याची दाट शक्यता असते. शिवाय अशा काही घटना अनेकदा समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा अशीच माहिती समोर आली आहे. गुगल प्ले स्टोरवरील ६ अ‍ॅप्सवरून जगभरातील २०० देशांतील युजर्सचा डेटा लीक होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हॅकर्स अनेक शक्कली लढवून डेटा लीक करत असतात. स्पायवेअरच्या माध्यमातून हॅकर्स व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि स्नॅपचॅट युजर्सचा डेटा लीक करीत असल्याचे उघड झाल्याचे समोर आले आहे.

गुगल प्ले स्टोअरमधील सहा अ‍ॅप्सच्या माध्यमातून हा लीकचा प्रकार सुरू होता. मुख्य म्हणजे हे अ‍ॅप्स  १ लाखांहून अधिक अँड्राॅईड युजर्सनी डाऊनलोड केले आहेत. ज्या स्पायवेअरच्या माध्यमातून डेटा लीक केला जातो त्या स्पायवेअरचे नाव ANDROIDS_MOBSTSPY असं आहे. हा स्पायवेअर Flappy Birr, Flappy Birr Dog, Flashlight, HZPermis Pro Arabe, Win7Simulator आणि WinLauncher या सहा अ‍ॅप्सच्या माध्यमातून डेटा लीक करीत होता अशी माहिती समोर आली आहे.

स्पायवेअरच्या माध्यमातून हॅकर्स हे कॉल डिटेल्स, कॉन्टॅक्ट्स, पर्सनल मेसेज, ऑडिओ-व्हिडिओ फाइल आणि फोटो हॅक करीत होते. धक्कादायक म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप, स्नॅपचॅट आणि फेसबुकचा डेटाही हॅक केला जात होता, असे संशोधकांनी अधिक तपास केल्यानंतर उघड झाले आहे. गुगलला या स्पायवेअर संदर्भात माहिती मिळताच गुगलने आपल्या प्लेस्टोअरमधील सहा अ‍ॅप्स हटवले आहे. दरम्यान, १ लाख युजर्सने हे अ‍ॅप्स डाउनलोड आणि इन्स्टॉल केले होते. त्या युजर्सचा डेटा चोरी झाला आहे की नाही किंवा सुरक्षित आहे की नाही, यासंदर्भात गुगलने काहीही सांगितले नाही.

संशोधकांनी याबाबत संशोधन केल्यानंतर अनेक बाबी यातून उघड झाल्या आहेत. एखाद्या युजर्सने या स्पायवेअरच्या अ‍ॅपला डाउनलोड केले तर हा स्पायवेअर त्या डिव्हाइसच्या इंटरनेट कनेक्शनला हॅक करून आपल्या कमांड आणि कंट्रोल सर्व्हरला जोडण्याचे काम करीत होता. कनेक्शन झाल्यानंतर डिव्हाईसची सर्व माहिती सहजपणे हॅक केली जात होती, असे एका संशोधनातून समोर आले आहे.