‘गगनयान’ प्रवाशांसाठी ‘फूड मेन्यू’ तयार, चाचणीसाठी पाठविले गेले नमुने

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय अवकाश मिशन गगनयानच्या प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या जेवणासाठीचा मेन्यू तयार करण्यात आला आहे. म्हैसूरमधील डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरी यांना अन्न पुरविण्याचे काम सोपविण्यात आले आहे. फूड मेन्यू तयार केल्यानंतर अन्नाचा नमुना हवाई दलाकडे चाचणीसाठी पाठविला गेला असल्याचे वृत्त आहे.

खाद्यपदार्थाचा नमुना पास झाल्यानंतर यास तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. अंतराळात दिले जाणारे हे चविष्ट ‘पॅक्ड फूड’ मार्च 2021 पर्यंत तयार होईल. 70 सदस्यांच्या वैज्ञानिकांच्या पथकाने गगनयान मिशनसाठी सध्या 7 दिवसांचा मेन्यू तयार केला आहे. गगनयान मिशनला अंतिम रूप देताना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) या स्वादिष्ट आणि पौष्टिक अन्नाची चाचणी घेईल आणि त्यानंतरच त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल.

तपासणी दरम्यान हे पाहिले जाईल की हे भोजन किती दिवस टिकेल. यासह, त्याची पौष्टिकता आणि त्याची चव देखील तपासली जाईल. डीएफआरएलने याआधी देखील अंतराळवीरांसाठी भोजन तयार केले आहे. हेच कारण आहे की इथल्या शास्त्रज्ञांना पुन्हा एकदा या अभियानामध्ये एकत्र जोडले गेले आहे. डीएफआरएलने 1984 मध्ये भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा (जे रशियन अंतराळवीरांसमवेत रशियन अंतराळ मोहिमेदरम्यान सात दिवसांपेक्षा अधिक काळ अंतराळ प्रवास करत होते) यांच्यासाठी भोजन तयार केले होते.