कुख्यात गुंड गजानन मारणेकडे कारागृह अधिक्षकांची भेटवस्तू, पैशांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – येरवडा कारागृहात असलेल्या कुख्यात गुंड गजानन मारणे याला पैसे व भेटवस्तूंची मागणी केल्याप्रकरणी कारागृहाचे अधिक्षक यु. टी. पवार यांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यासोबतच त्यांना लेखी म्हणणे मांडण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

कुख्यात गुंड गजानन मारणे हा सध्या एका खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात न्यायालयीन बंदी म्हणून आहे. त्याच्यावर खटला सुरु आहे. खटला चालविण्याच्यावेळी त्याला वेळोवेळी न्यायालयात हजर करण्यात येते. दरम्यान १६ फेब्रुवारी रोजी त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी केळकर यांच्या न्यायालयात सुनवाणीसाठी हजर करण्यात येणार होते. परंतु येरवडा कारागृह अधिक्षक यु. टी. पवार यांनी जाणूनबुजून त्याला न्यायालयात हजर केले नाही. तसेच त्याने पवार व त्यांच्या सहकाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतर तू माझी सोय केली नाही. मला महिना सुरु केला नाही. असे म्हणत तसेही तुम्हाला आत सडविण्याचेच व जेलबाहेर कुठेही न पाठविण्याचे पैसे मला मिळातात असे म्हणत पैशांची मागणी केली.

त्यानंतर या गजानन मारणे याचे वकील एड. विजयसिंह ठोंबरे यांनी त्याच्या वतीने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे यु. टी. पवार यांच्यावर कारवाई करण्यासाठी अर्ज दिला होता. त्यावर न्यायालयाने यु. टी. पवार यांना तुमच्यावर कारवाई का करू नये याबाबत लेखी म्हणणे मांडण्याचे आदेश देत कारणे दाखवा नोटीस सोमवारी बजावली आहे. तर कारागृह अधिक्षक यांच्या बेकायदेशीर मागण्या व आरोपींच्या होणाऱ्या नैसर्गिक मुल्यांची पायमल्ली विरुद्ध उच्च न्यायालयात रिट पीटीशन दाखल करणार असल्याची माहिती गज्या मारणेचे वकील एड. विजयसिंह ठोंबरे यांनी दिली.