कुख्यात गजानन मारणेची रवानगी सातारा कारागृहात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या येरवडा कारागृहात असलेला कुख्यात  गजानन मारणेची रवानगी सातारा कारगृहात करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.  येरवडा कारागृहाचे अधिक्षक यु. टी. पवार यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्याला दुसऱ्या कारागृहात हलविण्याची मागणी त्याच्या वकीलांनी केली होती.

येरवडा कारागृहात असलेला कुख्यात गुंड गजानन मारणे याला न्यायालयात हजर करण्याचे आदेश असताना न्यायालयात हजर केले नाही. त्यासाठी पैसे व भेटवस्तूंची मागणी कारागृहाचे अधिक्षक यु. टी. पवार यांनी केल्याची तक्रार त्याने न्यायालयात केली होती. याप्रकरणी पवार यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. त्यानंतर एड. एन. डी. पाटील आणि विजयकुमार ठोंबरे यांनी त्याला सुरक्षेच्या कारणास्तव दुसऱ्या कारागृहात हलविण्याची मागणी केली होती. त्यावेळी न्यायालयाने यासंदर्भात कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांना यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस दिली होती. यासंदर्भात स्वाती साठे यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले होते. त्यात त्यांनी सर्व आरोप फेटाळत त्याची रवानगी नागपूर कारागृहात करण्यात यावी असे म्हटले होते. त्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी त्याला सातारा कारागृहात पाठविण्याचा आदेश दिला आहे.