गजानन मारणे, छोटा राजन टोळीतील गुंड जेरबंद, पुणे गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गजानन मारणे आणि छोटा राजन टोळीतील सराईत गुन्हेगारांना पुणे गुन्हे शाखा युनिट -३ च्या पथकाने अटक केली आहे. छोटा राजन टोळीतील गुन्हेगार आणि महाराष्ट्र राज्य जनरल माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष अजय चक्रनारायण आणि गजानन मारणे टोळीतील जमीर शेख यांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी रात्री कोथरूड येथील साई पॅलेस बार जवळील रिक्षा स्टँड येथे करण्यात आली.

गुन्हे शाखा युनिट -३ चे पोलीस हवालदार प्रशांत पवार आणि पोलीस नाईक सचिन गायकवाड यांना पोलीस रेकॉर्डवरील दोन सराईत गुन्हेगार पौड रोडवरील साई पॅलेस बारजवळील रिक्षा स्टँड येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला असता पोलीस रेकॉर्डवरील जमीर शेख आणि अजय चक्रनारायण हे संशयास्पदरित्या फिरताना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल व तीन जिवंत काडतुसे असा एकूण १ लाख २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

जमीर शेख हा गजानन मारणे टोळीतील सराईत गुन्हेगार असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात गंभीर दुखापत, विनयभंग, शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर उत्तमनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचे सात गुन्हे दाखल आहेत. त्याचा साथीदार अजय चक्रनारायण हा राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन टोळीशी संबंधीत आहे. तसेच तो कोथरुड येथील महाराष्ट्र राज्य जनरल माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष असून छोटा राजन टोळीतील सक्रीय सदस्य आहे.

दोघांना शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता १६ मे पर्य़ंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त गुन्हे शिरिष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक निकम, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, किरण अडागळे, पोलीस कर्मचारी प्रशांत पवार, मच्छिंद्र वाळके, गजानन गानबोटे, दत्तात्रय गरूड, दिपक मते, सचिन गायकवाड, अतुल साठे, संदीप राठोड, विल्सन डिसोझा, रोहीदास लवांडे, सुजित पवार यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड करीत आहेत.