हरियाणामध्ये गांधी-नेहरू कुटुंबियांच्या संपत्तीची होणार चौकशी, खट्टर सरकारचा निर्णय

चंडीगढ : राज्याच्या मुख्य सचिव केशनी आनंद अरोरा यांनी हरियाणाच्या शहरी स्थानिक संस्था विभागाला संपत्तीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 2005 ते 2010 दरम्यान गांधी-नेहरू  कुटुंबाच्या नावावर हरियाणात अनेक संपत्ती जमवण्यात आल्याचा आरोप आहे.

हरियाणात 2005 ते 2014 च्या दरम्यान भूपेंद्र सिंह हुड्डा यांचे सरकार होते. आरोप आहे की, या काळात काँग्रेसचे अनेक ट्रस्ट आणि गांधी-नेहरू कुटुंबासाठी संपत्ती जमा करण्यात आली होती. एकुण संपत्तीचा अगोदरपासूनच तपास सुरू आहे. आता केंद्र सरकारच्या पत्रानंतर पुन्हा आदेश देण्यात आले आहेत.

केंद्राचे हरियाणा सरकारला पत्र
केंद्र सरकारने हरियाणा सरकारला राजीव गांधी फाऊंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टशी संबंधित संपत्तीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर मुख्य सचिव केशनी आनंद अरोरा यांनी शहरी स्थानिक संस्था विभागाला तपासाची जबाबदारी दिली आहे.

केंद्र करत आहे तीन ट्रस्टची चौकशी
चीनची कम्युनिस्ट पार्टी आणि पंतप्रधान मदत निधीतून पैसे दिल्याच्या वृत्तानंतर केंद्र सरकारने गांधी-नेहरू  कुटुंबियांशी संबंधीत ट्रस्ट आणि फाऊंडेशनच्या चौकशीचे आदेश दिले होते. राजीव गांधी फाऊंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टची चौकशी होणार आहे. यासाठी एक कमिटी बनवण्यात आली आहे.

काय करणार कमिटी
ही कमिटी राजीव गांधी फाऊंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टची तपासणी करेल. ज्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग आणि परदेशी देणगीसह अनेक कायद्यांचे कथित उल्लंघनाच्या प्रकरणांची चौकशी केली जाईल. गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यानुसार, टीमचे नेतृत्व अंमलबजावणी संचालनालयाचे विशेष संचालक करतील.

राहुल-प्रियंकाला मोदींवरील टिका भोवणार
गांधी-नेहरू  कुटुंबियांच्या संबंधित ट्रस्टच्या चौकशीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. राहुल यांनी म्हटले होते की, पीएम मोदी यांना वाटते की, संपूर्ण जग त्यांच्यासारखेच आहे. त्यांना वाटते की, प्रत्येकाची किंमत असते, किंवा भिती दाखवली जाऊ शकते. त्यांना कधीही समजणार नाही की, सत्यासाठी जे लढतात, त्यांना खरेदी केले जाऊ शकत नाही किंवा भिती दाखवली जाऊ शकत नाही.