गणेश बिडकर यांनी घेतली बापट यांची भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पालकमंत्री गिरीश बापट यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचे स्वीकृत नगरसेवक गणेश बीडकर यांनी बापट यांची भेट घेउन शुभेच्छा दिल्या. दोन वर्षांपुर्वी झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपच्या गटनेतेपदी असतानाही बीडकर यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने बिडकर आणि बापट यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता. परंतू बापट यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बीडकर यांनी एक पाउल पुढे जात बापट यांची भेट घेउन शुभेच्छा दिल्याने आगामी राजकारणाच्यादृष्टीने वेगळे संकेत मिळत आहेत.

पुणे महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपने ९८ जागा जिंकत एकहाती सत्ता काबीज केली. परंतू तत्पुर्वी महापालिकेत विरोधात असताना गटनेते गणेश बीडकर यांनी राज्य आणि केंद्रातील सत्तेचा आधार घेत सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसवर वरचष्मा ठेवला होता. त्यामुळे महापालिकेत सत्ता आल्यानंतर बीडकर यांना मानाचे पान मिळणार असेच संकेत मिळत होते. मात्र, संपुर्ण शहरात कमळ ङ्गुलले असताना बीडकर यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होेते. विशेष असे की त्यांचा निम्मा प्रभाग बापट यांच्या कसबा विधानसभा मतदारसंघात येतो. पराभवामुळे बीडकर हे अन्य काही नेत्यांबरोबरच बापट यांच्यावरही नाराज होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणार्‍या बीडकर यांना स्वीकृत सदस्यपदी संधी देण्यात आली.

परंतू राजकारण प्रवाही असते याचा पुन्हा प्रत्यय आला. कसबा विधानसभा मतदारसंघातून सलग पाचव्यांदा विधानसभेत जाणार्‍या बापट यांना पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपकडून अन्य उमेदवाराला संधी दिली जाणार हे निश्‍चित झाले आहे. बीडकर हे कसबा मतदारसंघातून विधानसभेवर जाण्यास इच्छुक आहेत. त्यामुळेच त्यांनी मागे घटलेल्या कटू घटना बाजूला ठेवत बापट यांची जातीने भेट घेवून शुभेच्छा दिल्या अशी चर्चा भाजप वर्तुळात आहे.