श्रीमंत दगडूशेठ गणपती ७५१ किलोचा सुक्‍या माव्याचा मोदक अर्पण

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्ण युग तरुण मंडळाच्यावतीने यंदाचा गणेश जन्मसोहळा साजरा करण्यात आला. त्यामध्ये पहाटे स्वराभिषेक, सकाळी गणेशयाग, गणेश जागर, सायंकाळी मिरवणूक आणि दुपारी १२ च्या सुमारास पाळणा गाऊन सुमारे १५० सुहासिनींच्या हस्ते दगडूशेठ गणपती मंदिरात गणेश जन्म सोहळा पार पडला.

फुलांची आरास व विद्युतरोषणाईने मंदिराला सजविण्यात आले होते. तसेच गणपती बाप्पाला ७५१ किलोचा सुक्‍या माव्याचा मोदक अर्पण करण्यात आला होता . दुपारी १२ च्या सुमारास १५ सुवासिनींच्या हस्ते गणेशजन्म सोहळा मंदिर परिसरात साजरा करण्यात आला.

पहाटे ४ ते ६ यावेळेत गायिका मधुरा दातार यांच्याकडून श्री चरणी स्वराभिषेक अर्पण करण्यात आला. सायंकाळी ६ वाजता श्रीं ची पालखीतून नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये फुलांनी सजविलेला आकर्षक रथ, प्रसिध्द बँड आदींचा सहभाग होता. अशी माहिती अध्यक्ष अशोक गोडसे, कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी यांनी दिली.यावेळी कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी म्हणाले, यंदा मंदिर ट्रस्टकडून गणेश जन्म सोहळ्यानिमित्त नगरप्रदक्षिणा, अभिषेक, गणेशयाग, श्री गणेश जागर असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

तसेच गणेश जन्म सोहळ्यानंतर भाविकांना सुंठवड्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. तसेच यंदा मंदिर ट्रस्टच्या मोरया प्रतिष्ठानकडून मुळशी तालुक्यातील उरवडे गावातील स्व.बाबुराव रायरीकर विद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले.