पुण्यातील 4 फुटी गणेशमूर्तींचा वाद अखेर ‘निकाली’ ! महापौरांनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आहे. राज्यात देखील कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातच आता गणेश उत्सव जवळ आला असून पुण्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. मात्र या उत्सवावर देखील कोरोनाचे सावट असणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने घरगुती गणेश भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाईडलाईनचे पालन करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

यापूर्वी महापालिकेने गणेश मंडळांसाठी गाईडलाईन जारी केल्या होत्या. पुण्यात 4 फुटी गणेशमुर्त्री वादाचा मुद्दा पेटला होता. पण अखेर यातून मार्ग काढण्यात आला आहे. मानाचे गणेश मंडळ पारंपारिक उत्सव मूर्तीच बसवणार पण दरवर्षी नवी मूर्ती बसवणाऱ्या मंडळांनी लहान मूर्ती बसवाव्यात असा निर्णय घेण्यात आला आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भात गणेश मंडळांना आवाहन केले आहे. पुण्यातील गणेशोत्सव यंदाच्या वर्षी साधेपणाने साजरा होणार आहे. यंदा कोणत्याही गणेशोत्सव मिरवणुका निघणार नाहीत. तर मंडळांसाठी गेल्यावर्षीचीच परवानगी ग्राह्य धरली जाणार असल्याची माहिती महापौरांनी दिली. त्यांनी गणेश मंडळ आणि प्रशासनाची बैठक बोलावली होती. त्यामध्ये हे निर्णय घेण्यात आले.

काय आहेत गाईडलाईन
1. घरगुती गणेशमूर्तींचे आगमन मिरवणुकीच्या स्वरुपाचे नसावे. आगमनासाठी जास्तीत जास्त 5 व्यक्तींचा समूह असावा. आगमनाप्रसंगी मास्क/शिल्ड, सॅनिटायझर, सामाजिक अंतर इत्याद स्वसंरक्षणाची साधने वापरण्यात यावीत.
2. घरगुती गणपतीची मूर्ती शक्यतो शाडूची असावी व या मूर्तीची उंची दोन फुटापेक्षा जास्त असू नये किंवा शक्य असल्यास यावर्षी पारंपारिक शाडूच्या गणेशमूर्ती ऐवजी घरात असलेल्या धातू/संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. जेणेकरून आगमन, विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वत:सोबत इतरांचे कोविड-19 पासून संरक्षण करणे शक्य होईल.
3. घरगुती गणेशमूर्तीची स्थापना करणाऱ्या भाविकांनी दर्शनास येणाऱ्या व्यक्तिंना मास्क परिधान करण्याचा आग्रह धरावा. तसेच सॅनिटायझरची व्यवस्था करावी.
4. भाविकांनी गणेश विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास या मूर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव किंवा 2021 च्या भाद्रपद महिन्यात पुढील वर्षीच्या विसर्जनाच्या वेळी देखील करता येणे शक्य आहे. (त्यासाठी मूर्तीचे पावित्र्य राखणेसाठी पवित्र वस्त्रात गुंडाळून घरीच मूर्ती जतन करून ठेवता येईल)
5. मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरीच करावे
6. विसर्जनाच्या घरच्या घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी मूर्तीचे विसर्जन करावे.
7. विसर्जनाच्या वेळी पाच व्यक्तिंपेक्षा अधिक व्यक्ती असू नयेत
8. नैसर्गिक विसर्जन स्थळावर विसर्जनासाठी जाणे शक्यतो टाळावे.
9. घरगुती, संपूर्ण चाळीतील, इमारतीतील गणेश मूर्ती विसर्जनाची मिरवणुक एकत्रितरित्या काढू नये.
10. विसर्जनस्थळी कमीत-कमी वेळ थांबावे. विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी यावे. यावळी मास्क, शिल्ड,सॅनिटायझर वापरावे.
11. बृहन्मुंबई महानगरपालिका/पोलीस प्रशासन यांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.
12. घर/इमारत गणेशोत्सव कालावधीत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यास प्रतिबंधित क्षेत्र नियमांचे पालन करावे.
13. उत्सव प्रसंगी अशी कोणतीही कृती करू नये, जेणेकरुन कोरोना विषाणुचा फैलाव होईल. अन्यथा अशा व्यक्ती साथरोग कायदा 1897, आपत्ती निवारण कायदा 2005 व भारतीय दंड संहिता 1860 कायद्यान्वये कारवाईस पात्र राहतील.