चाकरमान्यांना गणेशोत्सव काळात 7 दिवस क्वारन्टाईन व्हावे लागणार ?

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन  – यंदा गौरी-गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी नियम शिथिल करण्यात यावेत, या मागणी चाकरमनी करत आहेत. यासाठी कोकणातील सर्व पालकमंत्री, खासदार आणि आमदारांची आज (मंगळवार) मंत्रालयात दुपारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. कोकणात गणेशोत्सव काळात मुंबईतील चाकरमान्यांना प्रवेश द्यायचा की नाही? या मुद्दावर या बैठकीत चर्चा झाली. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असून ते लवकरच आपला निर्णय जाहीर करतील.

या बैठकीस उदय सामंत, अनिल परब, आदिती तटकरे कॅबिनेट मंत्रीसह कोकणातील आमदार, खासदर आदी उपस्थितीत होते. कोकणात गणेशोत्सव काळात प्रवेश देण्याच्या नियमावली यावरून नाराजी असून त्यावर चर्चा करून त्यात बदल करणे शक्य आहे का? यावर चर्चा झाली.

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. सध्या गणेशोत्सव जवळ येत आहे. गणेशोत्सव काळात कोकणात घरी जाऊन हा उत्सव अनेक मुंबईकर साजरा करतात.

कोकणात गणेशोत्सव काळात येणाऱ्यांना 14 ऐवजी 7 दिवस क्वारन्टाईन करावे. प्रत्येक चाकरमान्यांची सवलतीत किंवा मोफत कोविड टेस्ट करावी. यंदा कोकणातल्या गणेशभक्तानी 11 ऐवजी 7 दिवसांचा घरगुती गणेशोत्सव करावा, अशा मागण्या केल्या आहेत.

या बेठकीनंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अनिल परब म्हणाले, कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी सर्व लोकप्रतिनिधींसोबत चर्चा झाली. यात सर्व लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मागण्या चर्चेत मांडल्या. त्यांचे सर्व सूचना, प्रस्ताव आम्ही आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देणार असून याचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. त्यामुळे ते लवकरच यासंदर्भात आपला निर्णय जाहीर करतील.

यंदा 22 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात मुंबई आणि परीसरातून लाखोंच्या संख्येने गणेशभक्त कोकणात आपल्या घरी जातात. त्यांना यंदाच्या वर्षी कोरोनामुळे नियमांचे निर्बंध घातले आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांमध्ये नाराजी आहे. गौरी-गणपतीसाठी हे नियम शिथील करावे, अशीही मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून केली जातेय. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांमध्ये कोकणात शिथिलता देणार का? याचा निर्णय लवकरच मुख्यमंत्री घेणार आहेत.

जेव्हा निर्णय होईल, तेंव्हा अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही सर्व तयारी करून ठेवली आहे. किती गाड्या सोडायच्या आहेत?. किती परवानगी पासेस द्यायचे आहेत?. जसा निर्णय येईल, तसा जाहीर केले जाईल, असेही अनिल परब यांनी सांगितले आहे.