गणपती बाप्पासाठी यंदा ट्राय करा ‘तळणीचे रुचकर मोदक’, जाणून घ्या ‘रेसिपी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – 22 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरु आहे. घराघरात सजावटीसाठी आणि घर आवरण्यासाठी धावाधाव सुरु आहे. बाप्पाला काय आवडतं काय नाही याची तर लोक विशेष कळजी घेताना दिसतात. बाप्पांच्या आवडीचा पदार्थ म्हणजेच मोदक. अनेकजण मोदकांमध्ये वेगवगळे प्रकार ट्राय करताना दिसतात. आज आपण जाणून घेणार आहोत की, तळणीचे रुचकर मोदक कसे बनवावेत.

काय साहित्य लागेल ?
– दोन वाट्या चणाडाळ
– पाव किलो गूळ
– दोन चमचे वेलची पूड
– दोन वाट्या गव्हाची कणीक
– चवीपुरते मीठ, तळायला डालडा

कृती
चणाडाळ आदल्या दिवशी रात्री भिजत घाला. दुसऱ्या दिवशी कुकरला लावून शिजवून घ्या. या शिजलेल्या डाळीतच गूळ चिरून घाला आणि सगळं मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळून घ्या. या पुरणात कालथा उभा राहिला की, समजा हे तयार झालं आहे. पूरण घट्ट होत असतानाच त्यात चवीप्रमाणे मीठ आणि वेलची पूड टाका. हे पूरण तुम्ही पूरणयंत्रऐवजी मिक्सरमधून काढलं तरी हरकत नाही. पूरण झाल्यानंतर लगेच कणीक मळून घ्या. या कणकेच्या नेहमीसारख्या पोळ्या लाटा आणि वाट्यांनी जशा पुऱ्या पाडतो तशा पाडा. यानंतर एका हातात पुरीची पारी घेऊन तिच्या मध्यभागी पूरण ठेवून मग ही पारी दुसऱ्या हाताने एकत्र करून बंद करा. हे झाले कणकेचे मोदक तयार. तेलात सोनेरी रंगावर तळल्यावर तयार झालेले हे मोदक तुम्ही बाप्पाला दाखवू शकता. नंतर काही मोदकांचा आस्वाद तुम्ही स्वत:ही घेऊ शकता. याची खासियत म्हणजे उकडीच्या मोदकांना ज्याप्रमाणे कळ्या पाडण्यासाठी श्रम घ्यावे लागतात तसे या मोदकांना श्रम घेण्याची गरज नाही.

‘या’ वेळेत करा गणेश मुर्तीची स्थापना
गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी 7.55 ते 9.30 पर्यंत राहू काळ असणार आहे. तसेच दुपारी 3.22 आणि त्यानंतर पुढे विष्टी करण असणार आहे. त्यामुळे सकाळी 10 ते दुपारी 3 वाजताच्या दरम्यान तु्म्ही गणेश मुर्तीची करून विधीवत स्थापना करू शकता. याशिवाय अभिजित मुहूर्त दुपारी 12.12 ते 1.03 असणार आहे. अन्य शुभकाळ पाहण्याची तु्म्हाला आवश्यकता असणार नाही.