गोमातेच्या शेणापासून साकाराली श्रींची मूर्ती !

पुणे : कोरोना व्हायरसच्या विषाणूमुळे यावर्षी गणराय अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. मात्र, कार्यकर्त्यांची धावपळ आणि धांदल कुठेही दिसत नाही. तरीसुद्धा गणरायाच्या आगमनाविषयी तसूभरही माया कमी झाली नाही. गणरायाच्या मूर्ती बनविण्यासाठी कलाकाराची धांदल सुरूच आहे. त्यातच मूर्तीकार दरवर्षी नव्या संकल्पना आणि नवनव्या क्लृप्त्यांचा वापर करीत गणेशभक्तांना नवीन काही तरी देण्याचा प्रयत्न करतो, असाच एक नवीन प्रयोग गायीच्या शेणापासून गोमाय श्रींची मूर्ती बनवून पुण्यातील जयंत घोलप आणि पाचपाखडी (जि. ठाणे) येथील नरेश नागपुरे या दोन तरुणांनी सादर केला आहे. या उपक्रमामध्ये मंथन खंडाळे, निखील पवार, शुभम कोपरेकर, हृतिक उत्तेकर या मित्रमंडळींच्या मदतीने श्रींची मूर्ती साकारण्यास मदत झाली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागिल साडेचार महिन्यांपासून सर्व व्यवहार ठप्प झाले. मात्र, कलाकार हातावर हात ठेवून बसेल, तर त्याला कलाकार का म्हणायचे असाही प्रश्न अनेकांच्या डोळ्यासमोर तरळल्याशिवाय राहणार नाही. नागपुरे आणि घोलप या कलाकारांनी पीओपी, शाडू मातीपेक्षा आणखी काही वेगळ्या पद्धतीने श्रींची मूर्ती साकारता येईल का याचा अभ्यास केला. फक्त अभ्यास करून थांबले नाही, तर त्यांनी ते कृतीतही आणले, हे महत्त्वाचे आहे. गोमाय श्रींची मूर्ती आकर्षक आणि सुबक बनविण्यासाठी गायीचे शेण, चंदन पावडर, हळद, गुलाबजल असे साहित्य वापरून एक फूट उंचीची मूर्ती तयार केली. श्रींची मूर्ती विसर्जन केल्यानंतर पाच तासांत पाण्यात विरळघून जाते आणि त्यापासून खत तयार होते. त्यामध्ये तुळशीचे रोप लावता येते आणि त्यापासून हवा शुद्धीकरण होण्यास मदत होते.

सृष्टी गोमय गजाननाची मूर्ती देशी गायीच्या गोमयावर शास्त्रीय प्रयोग करून घडविलेली सुबक मूर्ती आहे. त्यामध्ये सुगंधी द्रव मिश्रीत केले आहे. घरातील नकारात्मक गोष्टी, नाकारात्मक विचार खेचून घेण्याची ताकद देशी गायीच्या गोमयामध्ये असते, असे म्हटले जात आहे. सृष्टी गोमय गजाननाची मूर्ती घरच्या घरी विसर्जन करता येऊ शकते.

घोलप आणि नागपुरे यांचा ग्रुप जाहिरात क्षेत्रात काम असल्याने त्यांनी क्लृप्त्या लढवल्या. मागील अनेक वर्षापासून शेणापासून गणेशमूर्ती कारखान्यामध्ये साकारण्याचे स्वप्न दोघेही पाहात होते, नव्हे निसर्गच त्यांची परीक्षा घेत होता, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अखेर पर्यावरणासाठी कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन काळात दोघांनाही ही संधी चालून आली. संकटकाळात बाप्पा दोघांच्याही मदतीला धावून आला आणि त्यांनी गोमाय श्रींच्या अनेक मूर्ती साकारल्या आहेत. श्रींची मूर्ती आकर्षक बनवण्यासाठी मागिल काही वर्षांपासून प्लास्टर ऑफ पॅरिसचा भरमसाट वापर वाढला आहे. त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

निसर्ग, समुद्र, विहिरी, नद्यांचे पाणी प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. प्रदूषण टाळण्यासाठी श्रींच्या मूर्ती बनविणाऱ्या कलाकारांनी नागपूर येथून प्रक्रिया केलेले शेण मिळत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी त्याची माहिती घेऊन त्याचा वापर केला आणि श्रींच्या मूर्ती बनविली. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई मंदिराच्या जवळ श्रींच्या मूर्ती बनविण्याचा कारखाना आहे, तेथे आम्ही या मूर्ती बनवित आहोत.

विधात्याने सृष्टी निर्माण केली आणि मानवाने या सृष्टीतच आपला विधाता शोधून पृथ्वी, जल, वायू, आकाश व अग्नी अशी पंचमहाभूतं मनोभावे पूजली आणि जोपासली.

पयार्वरणपूरक सृष्टी गोमय गजानन (म्हणजेच गाईच्या शेणापासून तयार केलेला गणपती बाप्पाची मूर्ती)

या गोयम गणपती मूर्तीची वैशिष्ट्ये :

• गोमयावर शास्त्रीय प्रयोग करून त्यापासून घडवलेली सुबक मूर्ती

• सुगंधी द्रव मिश्रित

• उत्कृष्ट व अनुभवी कलाकारांनी साकारलेली मूर्ती

• घरच्या घरी विसर्जन करावयाची पर्यावरणपूरक मूर्ती

• विसर्जनानंतर उरलेला गाळ म्हणजे दर्जेदार नैसर्गिक खत

१) पर्यावरणपूरक श्री गजाननाची मूर्ती असल्यामुळे नदी – तलाव आणि इतर विसर्जनाची स्थळे दूषित होण्यापासून वाचतात.

२) या उपक्रमात जयेंद्र घोलप, नरेश नागपुरे, निखिल पवार, शुभम कोप्रेकर, मंथन खंडाळे, ह्रितिक उतेकर हि मंडळी सहभागी आहेत.

३) या वर्षीपासून पुढे कायम सर्वांनी पर्यावरणपूरक श्री गजाननाची मूर्ती आणावी आणि आपल्या पर्यावरणाला हातभार लावावा.

या गणेशोत्सवा पासुन निश्चय करु या.

प्लास्टरचा गणपती नाकारू या.

भक्तिभावाने गोमय गजानन बसवूया. परंपरे सोबत पर्यावरणही जपू या.