गणेश मुर्ती विक्रेत्यांची महापालिका परवानगीकडे पाठ ! डिपॉझीट, भाडेदर कमी करण्याचे महापौरांचे आश्‍वासन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी यंदा गणेश मुर्ती विक्रेत्यांना रस्त्याच्या कडेला पदपथांवर स्टॉल उभारण्यास महापालिका प्रशासनाने मनाई केली आहे. पर्याय म्हणून शहराच्या विविध भागातील महापालिकेच्या शाळांच्या आवारात भाडेतत्वावर तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, भाडेदर अधिक असल्याने आतापर्यंत केवळ दोनच विक्रेत्यांनी ऑनलाईन परवानगीसाठी अर्ज केला असून उर्वरीत विक्रेत्यांनी त्याकडे पाठच फिरविली आहे. शहरामध्ये दरवर्षी गणेशोत्सवामध्ये सहा लाख मुर्तींची विक्री होते. यामध्ये घरात बसविण्यात येणार्‍या मुर्तींच अधिक असतात. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी यंदा सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार असुन बहुतांश मंडळे मंदिरातच गणेश प्रतिष्ठापना करणार आहेत.

घरात बसविण्यात येणार्‍या मुर्तीही घरातच विसर्जित करण्याचे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले असून मुर्ती विक्रेत्यांना पारंपारिक पद्धतीने यावर्षी रस्त्याच्या कडेला मुर्ती विक्रीचे स्टॉल उभारण्यास मनाई केली आहे. त्याऐवजी महापालिकेच्या शाळांच्या आवारात स्टॉलसाठी भाडेतत्वावर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिकेने जाहिरातही प्रसिद्ध केली आहे. मात्र, मागील पाच दिवसांत ङ्गक्त दोनच विक्रेत्यांनी शाळेच्या आवारात स्टॉल उभारण्यासाठी महापालिकेकडे ऑनलाईन अर्ज केला आहे. गणेशोत्सवासाठी दहाच दिवसांचा कालावधी उरला असताना मुर्ती विक्रेत्यांनी परवानगीसाठी अर्ज करण्याकडे पाठ ङ्गिरविली आहे.

यासंदर्भात मुर्ती विक्रेत्यांकडे विचारणा केली असता, शाळेच्या आवारात मंडप उभारणी तसेच भाडेदर अधिक असल्याने व्यवसाय परवडणारा नाही. यासोबतच ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आल्याने शहराच्या विविध भागातून ठराविक ठिकाणी येणारे ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पुर्वी रस्त्याच्या कडेला अवघ्या दोन हजार रुपये भाडेदरामध्ये परवानगी मिळत होती. परंतू शाळेच्या आवारातील भाडेदराची प्रक्रिया मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून केली असल्याने दररोज ९०० रुपये भाडेदर आकारण्यात आला आहे. यामुळे अगोदरच संकटात सापडलेल्या मूर्तीकारांपुढील आणि विक्रेत्यांपुढील संकट वाढले आहे. मुर्ती विक्रीच्या स्टॉलचे डिपॉझीट व भाडेदर कमी करण्यात येईल.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विक्रेत्यांनी पदपथांवर स्टॉल उभारू नये – महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आवाहन दरवर्षी महापालिकेच्यावतीने रस्त्याच्या कडेल गणेश मुर्ती विक्रेत्यांना स्टॉलसाठी परवानगी देण्यात येते. परंतू यंदा कोरोनाचे संकट असल्याने संसर्ग टाळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना सर्वच नागरिकांनी सहकार्य केले आहे. दरवर्षी ज्या स्टॉल धारकांना परवानगी देण्यात येते, त्यांनी यंदा महापालिकेच्या शाळांचे आवार, ऍमेनिटी स्पेस अथवा मोकळ्या जागांवर परवानगी घेउन व कोरोना व अन्य सुरक्षेच्या उपाययोजना करून महापालिकेकडून परवानगी घ्यावी. यासाठी आकारण्यात येणारी डिपॉझिट व भाडेदराची रक्कम कमी करण्यात येईल. तसेच विक्रेत्यांना शाळांतील वर्गखोल्याही उपलब्ध करून दिल्या जातील, त्यामुळे मंडपाचा खर्चही वाचेल. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वांच्या सुरक्षिततेसाठी विक्रेत्यांनी यावर्षी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.