पुणेकरांचे मनःपूर्वक आभार ! पोलीस आयुक्तांनी मानले ‘या’ शब्दांत आभार

पोलिसनामा ऑनलाईन टीम – सार्वजनिक गणेशोत्सव पुण्यात मोठ्या दणक्यात साजरा केला जातो. यंदा कोरोनामुळे विसर्जन मिरवणुकांना बंदी असल्याने वेळेत, शिस्तीत आणि पर्यावरणाची काळजी घेत यंदाचा गणेशोत्सव पार पडला. त्यामुळे विसर्जन सोहळ्यात सुरक्षा योजनेच्या नियोजनासाठी पोलिसांवरही यावेळी कसलाही ताण आला नाही. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी विशेष शब्दांत जनतेचे आभार मानले आहेत.

पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी ट्विट करुन पुणेकरांचे आभार मानत भावना व्यक्त केल्या. कसलाही भपका नाहीमोठमोठ्या मूर्ती नाहीत.मिरवणूक नाही. सारे कसे साधेपणाने, शिस्तीत आणि पर्यावरणाची काळजी घेऊनच. पुढल्या वर्षीही गणेशोत्सव प्रचंड उत्साहाने, पण अशाच शिस्तीने, इकोफ्रेन्डली पद्धतीने साजरा होऊ दे अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. दरवर्षी विसर्जन मिरवणुकांचा दणदणाट असतो. शिस्तबद्ध पारंपारिक ढोल-ताशा पथकांपासून तरुणाईला डोलायला लावणार्‍या डीजेंपर्यंत सर्वकाही या मिरवणुकांमध्ये दिसून येते.

त्याचबरोबर या मिरवणुका अनुभवण्यासाठी देशभरातून लोक पुण्यात येतात. त्यामुळे शहराच्या मध्यवस्तीत मिरवणूक मार्ग भाविक आणि हौशी पर्यटकांच्या तुडूंब गर्दीने फुलून गेलेला असतो. अशा परिस्थितीत या गर्दीच्या नियोजनासाठी आणि सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांवर या काळात प्रचंड ताण असतो. सर्वकाही सुरळीत पार पाडण्यासाठी रात्रंदिवस काम करीत असतात. यंदा मात्र, पोलिसांनाही काहीसा दिलासा मिळाला. त्यामुळेच पुणे पोलीस आयुक्तांना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरवर्षी मुख्य विसर्जन मार्गावरुन आलेल्या आणि डेक्कन येथील खंडोजीबाबा चौकातील विसर्जन घाटावर विसर्जन झालेल्या गणपतींच्या विसर्जनाची वेळ पोलिसांकडून नोंदवली जाते. यावरुन विसर्जन सोहळ्याला किती वेळ लागला हे सांगता येते.