गणेश जयंती निमित्तानं चिंतामणी मंदिर निघालं उजळून

लोणी काळभोर : पोलिसनामा ऑनलाइन (शरद पुजारी) – आज माघ महिन्यातील विनायकी चतुर्थी असल्याने गणेश भक्तामध्ये याचे विशेष महत्त्व आहे. ही चतुर्थी गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्ताने आज अष्टविनायकापैकी एक असलेल्या थेऊर येथील श्री चिंतामणी गणपती दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

चिंतामणी देवाचे पुजारी राजेंद्र आगलावे यांनी पहाटे चार वाजता महापुजा केली. त्यानंतर महान गणेशभक्त मोरया गोसावी यांचे वंशज पिरंगुटकर तसेच हिंजवडीकर देव यांच्या वतीने अरुण देव व प्रकाश देव यांनी महाअभिषेक करण्यात आला. चिंचवड देवस्थानच्या वतीने मोरेश्वर पेंडसे यांनी महापुजा केली. आज सर्वत्र गणेश जयंतीची धामधूम सुरु असते. सर्वत्र वेगवेगळ्या प्रकारे पुजा अर्चना महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

येथील चिंतामणी मंदिरात भजन पुजन केले गेले. तसेच आगलावे बंधू यांचेवतीने संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. त्यामुळे संध्याकाळी हा परिसर नेत्रदीपक दिसत होता. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. या सर्व व्यवस्थेवर चिंचवड देवस्थानचे व्यवस्थापक मंगलमूर्ती पोफळे लक्ष ठेऊन होते. रात्री नऊ वाजता आगलावे बंधू श्रींचा छबिना काढणार आहेत व रात्री पिरंगुटकर देव व हिंजवडीकर देव यांच्याकडून रात्रभर पंचपदी केली जाणार आहे. यात महासाधू मोठ्या गोसावी चिंतामणी महाराज नारायण महाराज रचित पदे गायली जाणार आहेत.