नवी मुंबईत गणेश नाईकांना ‘धक्का’, भाजपाचे ४ नगरसेवक शिवबंधनात !

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नवी मुंबईच्या राजकारणावर आणि महापालिकेवर गेली अनेक दशकं एकछत्री अंमल गाजविणाऱ्या व भाजपावासी झालेले आमदार गणेश नाईक यांच्या साम्राज्याला भाजपाच्याच नगरसेवकांनी सुरुंग लावला आहे. भाजपाच्या ४ नगरसेवकांनी राजीनामा दिला असून ते रविवारी शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या चारही नगरसेवकांना शिवबंधन बांधणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या निवडणुकाआधीच हा भाजपा आणि गणेश नाईक यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, संगीता वास्के, मुद्रिका गवळी अशी राजीनामा दिलेल्या नगरसेवकांची नावे आहेत. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते असलेले गणेश नाईक यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांसह भाजपामध्ये प्रवेश केला होता. नवी मुंबई महापालिकेत गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईतील नेरुळमध्ये भारतीय जनता पक्षांचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले होते.

नाईक हे आपल्या सर्वच नगरसेवकांसह भाजपामध्ये आल्याने मुळ भाजपाच्या असलेल्या नगरसेवकांमध्ये असंतोषाची भावना आहे. आपल्याला डावलले जातेय अशी त्यांची भावना असल्याने नगरसेवकांमध्ये होती. सुरेश कुलकर्णी व इतर नगरसेवकांची पूर्व भागावर चांगलीच पकड आहे. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीने कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन नवी मुंबई महापालिका निवडणुका आघाडीकडून लढविण्याचा निर्णय घेतला आहे.