Ganeshotsav 2020 : गणेशोत्सवात चाकरमन्यांसाठी मनसे सोडणार बसेस, बुकिंग सुरू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी उत्सुक असलेल्या लाखो चाकरमान्यांची लॉकडाऊनमुळे कोंडी झाली आहे. राज्य सरकार ही कोंडी फोडण्यासाठी कुठलाही प्रयत्न करीत नाही, असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच कोकणवासीयांच्या मदतीला धावली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणार्‍या चाकरमान्यांसाठी येत्या 4 ऑगस्टपासून बसेस सोडण्यात येणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अर्थात मनसेने केली आहे, अशी माहिती मनसेचे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

’गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारने कोकणातील गणेशभक्त मोठ्या संभ्रमात आहेत. गावाला गेल्यावर 14 दिवस क्वारंटाइन व्हावे लागणार की 7 दिवस? याचा घोळ अद्याप संपलेला नाही. राज्यातील अकार्यक्षम सरकार कुठलाही निर्णय घेण्याच्या तयारीत आणि मन:स्थितीतही नाही,’ असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

’कोकणवासीयांसाठी बस सोडा अशी मागणी मनसेने केली होती. त्यावर बसेस सोडू असेही आश्वासन एसटी महामंडळाने आम्हाला दिले होते. पण, त्या दृष्टीने कुठलीही हालचाल होताना आढळत नाही. आम्ही त्यांच्याशी वारंवार संपर्क केला. मात्र, त्यांच्याकडून काहीही उत्तर आले नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मनसे म्युनिसिपल कर्मचारी सेना येत्या 4 ऑगस्टपासून कोकणात जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करणार आहे. सर्व चाकरमान्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन देशपांडे यांनी केले आहे. येत्या 1 ऑगस्टपासून बसेसच बुकिंग सुरू होईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

एसटी महामंडळ गप्प का?
चाकरमन्यांना कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी एसटी महामंडळाने आपल्या बसेस सोडण्याबातचा कोणताही निर्णय घेतलेला दिसत नाही. त्यामुळे यंदा गावी गणेशोत्सवासाठी जाण्याच्या निर्णयाबाबत चाकरमनी गोंधळून गेले आहे. सध्या कोराना विषाणूचे वाढते संक्रमण पाहता सरकार देखील कोणतीही ठोस भूमिका घेत नाही, असेच आढळून येत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला ज्या ठिकाणी फायदा होणार असेल तर महामंडळ बसेसे सोडण्याबाबत का निर्णय घेत नाही? असा प्रश्न आता अनेकांना पडत आहे.

आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेऊन चाकरमन्यांना गावी सोडण्यासाठी काम करत आहे. त्यांनी बसेसची देखील सोय केली असून आता ज्या चाकरमन्यांना गावी जायचे आहे, त्यांच्यासाठी बुकिंगची देखील व्यवस्था त्यांनी केली आहे. दळणवळाची सोय करण्यासाठी एसटी महामंडळाने पावले टाकायला हवीत. मात्र कोणताही निर्णय न घेता हेच एसटी महामंडळ गप्प का आहे? असा प्रश्न आता पडत आहे.