गणेशोत्सव 2020 : यंदा पुण्यात ‘प्रतिष्ठापना’ व ‘विसर्जन’ मिरवणूकीस परवानगी नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वैभवशाली गणेशोत्सव महिन्यावर येऊन ठेपला आहे. यापार्श्वभूमीवर बुधवारी शहरातील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची पोलीस आयुक्तालयात बैठक पार पडली. त्यावेळी कोरोनाचा धोका ओळखून शासनाने केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मंडळांनी गणेशोत्सव साजरा करता येईल, याबाबत या बैठकीत चर्चा झाली आहे. शासनाचे नियम आणि काही उपाययोजना पाहता यंदा शहरातील गणेशोत्सवनिमित्त पोलिसांकडून नियमावली करण्यात येणार आहेत.

पोलीस आयुक्त डॉ. के.वेंकटेशम, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्यासह शहरातील प्रमुख मानाच्या मंडळांचे पदाधिकारी व इतर पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते. सहपोलीस आयुक्त डॉ. शिसवे म्हणाले, शासनाने मंडळांसाठी मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. या सूचनांचे पालन काटेकोरपणे गरजेचे आहे. प्रतिष्ठापना व विसर्जन मिरवणुकीला परवानगी नसणार आहे.

घरगुती गणेशोत्सवाबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांनी घरीच ‘श्रीं’च्या मूर्तीचे विसर्जन करावे. गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेण्यासाठी या बैठक आयोजित केली होती. त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. उत्सव साधेपणाने कसा साजरा करता येईल, याबाबत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे मत घेण्यात आले. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे पोलीस आयुक्त डॉ. वेंकटेशम यांनी सांगितले.