समाजहित आणि भक्तांचे आरोग्य हित लक्षात घेवुन श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – समाजहित आणि गणेश भक्तांचे आरोग्य हित लक्षात घेत कोरोनाच्या पार्श्वभुमीवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने यंदाचा गणेशोत्सव मुख्य मंदिरातच साजरा करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. दरवर्षी होणार्‍या वैभवशाली गणेशोत्सवाचा ‘थाटमाट’ रद्द करून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा मोठा निर्णय घेण्यात आला असून लोकभावना जपण्यासाठी मुख्य मंदिरातच उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

श्रीमंत दगडूशेठ गणपती दरवर्षी उत्सवाची पारंपारिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे विराजमान होतो. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भारतातूनच नव्हे तर परदेशातून देखील गणेशभक्त येतात. दरवर्षी होणारी अलोट गर्दी पाहता आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून यंदाचा उत्सव मुख्य मंदिरातच घेण्यात येणार आहे. बाप्पांच्या ऑनलाईन दर्शन सुविधेवर आणि ऑनलाईन कार्यक्रमांवर जास्त भर देण्यात येणार असल्याची माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावर्षी गणेशोत्सवात आरोग्यविषयक माहिती, जनजागृती आणि आरोग्यसेवा देण्यात येणार आहे. मंदिरामध्ये प्रवेश न करता बाहेरूनच बाप्पांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. हार, पेढे, नारळ, फळे स्वकारले जाणार नाहीत तसेच प्रसादही दिला जाणार आहे. मुख्य मंदिरातच उत्सव साजरा होणार असल्यानं गेल्या 127 वर्षात यंदा प्रथमच ही परंपरा खंडित होत आहे. समाजहित आणि गणेश भक्तांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टनं हा निर्णय घेतला आहे