नांदेडमध्ये वृद्ध दांपत्यास लुणाऱ्या टोळीला पुण्यातून अटक

माधव मेकेवाड

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – वृद्ध दांपत्यास मारहाण करुन सव्वा लाखाचा रुपयाचा ऐवज चोरुन नेणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली. या अंतरराज्य टोळीने अर्धापूर तालुक्यातील गणपूर येथे वृद्ध दांपत्यास बेदम माहरण करुन ऐवज चोरुन नेला होता. ही कारवाई बुधवारी (दि.२८) रात्री करण्यात आली.

अर्धापुर तालुक्यातील गणपूर संभाजी एकनाथ मोहीते यांच्या घरी १६ नोव्हेंबरच्या रात्री दीड ते दोनच्या सुमारास दरोडेखोरांनी हैदोस घालत कत्तीने वृध्द संभाजी मोहीते यांना माराहण केली. तसेच त्यांना बाजेला बांधून टाकले. तसेच त्यांच्या पत्नीला व एका लहान बालकाला बेदम मारहाण केली. अंगावरील दागिने व रोख रक्कम असा सव्वा लाखाचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी अर्धापूर ठाण्यात अज्ञातांविरूध्द दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता.

पोलिस अधिक्षक संजय जाधव, अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या सुचनेवरून पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग भारती यांनी महेश कुलकर्णी, शेख जावेद, ब्रम्हानंद लामकुरे, व्यंकट गंगुलवार, महमद अलीम, धोंडीराम केंद्रे आणि श्री. बुगडलवाड यांच्यासह पूणे, चंद्रपूर आणि नांदेड जिल्ह्यात आरोपींचा शोध सूरू केला. पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती यांना ही टोळी पुण्यात असल्याची माहिती मिळाली. भारती यांनी पुण्यात येऊन आरोपींचा शोध घेतला. बुधवारी रात्री या टोळील अटक करण्यात यश आले असून आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

 माधव उर्फ रवी संभाजी मोहिते (रा. पळसगाव, ता. वसमत, जिल्हा हिंगोली, सध्या रा.अभिनव कॉलेजवळ नऱ्हेगाव ता. हवेली, जिल्हा पूणे), सचीन भास्कर जाधव (रा. पिंपळशेंडा ता. मालेगाव जिल्हा वाशिम), मोहमद रियाज मोहमद अली (रा. हेंगरीजान जिल्हा मोरानहट (आसाम) आणि सारंग शंकर नादरे (रा. गणपूर ता. अर्धापूर जिल्हा नांदेड) यांना बुधवारी रात्री अटक केली. या चारही जणांनी गुन्ह्याची कबुली दिली. या चारही आरोपींना अर्धापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पुढील कारवाही सुरू आहे.