खरवस विक्रीच्या बहाण्याने लुटणाऱ्या बारामतीतील टोळीला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – म्हशीच्या दुधाचे चिक व गावरान तुप विक्री करण्याच्या बहाण्याने शहरात ज्येष्ठ नागरिकांना लुबाडणाऱ्या बारामती तालुक्यातील टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. त्यांनी सात गुन्ह्यांची कबुली दिली असून पोलिसांनी गुन्ह्यातील साडे सहा लाखांचे दागिने जप्त केले आहेत.

अशोक उर्फ कांट्या विश्वनाथ गंगावणे (वय २७), सुनिल सोमनाथ वाईकर (वय ३०, रा. विठ्ठलवाडी, ता. बारामती), नवनाथ विष्णू वाईकर (वय २२), लंकेश पोपट वाईकर (वय २२, दोघे रा. बांदलवाडी, ता. बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मागील काही दिवसांत शहरात दुध तसेच तुप विक्रीच्या बहाण्याने काही जन घरात शिरत. घरातील ज्येष्ठ महिलांना बोलण्यात गुंतवून त्यांचा विश्वास संपादन करत. घरातील महिलांना आमच्या घरी लग्न आहे. त्यासाठी सोन्याचे दागिने बनवायचे आहेत. तुमच्याजवळील दागिने दाखवा. त्यासारखेच बनावयचे असल्याचे सांगून घेत. त्यानंतर आई किंवा वडिल खाली थांबले आहेत. त्यांना दाखवतो म्हणून आरोपी दागिने घेऊन पसार होत होते. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता आरोपी निष्पन्न झाले. आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस कर्मचारी योगेश जगताप आणि मल्लीकार्जुन स्वामी, सुधाकर माने यांना या टोळीची माहिती मिळाली. ही टोळी बांदलवाडी येथे असल्याचे सजताच पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे गुन्ह्याची चौकशी केली असता सुनिल वाईकर याच्या मदतीने गुन्हे केल्याची माहिती दिली. त्यानंतर सुनिल यालाही पकडण्यात आले.

आरोपींकडून समर्थ, अलंकार, भारती विद्यापीठ, मार्केटयार्ड, चिंचवड व निगडी येथील असे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यातील ६ लाख ५४ हजार रुपयांचे दागिने, तीन दुचाकी, मोबाईल असा एकूण १० लाख ७० हजार ररुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी अशोक उर्फ कांट्या याचच्यावर यापुर्वी सोने चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी केले आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील, हनुमंत शिंदे, कर्मचारी तुषार खडके, इरफान मोमीन, अमोल पवार, अजय थोरात यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त