पाकिस्तानातून ‘मीठा’तून अंमली पदार्थ आयात करणारा गँगचा म्होरक्या जाळ्यात, हिजबुल मुजाहिद्दीनशी होता संबंध

चंदीगड : वृत्त संस्था – पाकिस्तानमधून हेरॉईनसह वेगवेगळी अंमली पदार्थांची आयात करणार्‍या टोळीच्या म्होरक्याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. रणजीत राणा चीता असे त्याचे नाव आहे. रणजीत बरोबरच त्याचा भाऊ गगनदीप भोला यालाही हरियाणामधील सिरसा येथील बेगू गावातून शनिवारी सकाळी अटक केली आहे.

जून २०१९ मध्ये पाकिस्तान सीमेवरील अटरी येथे ५३२ किलो हेरॉईनचा साठा पोलिसांनी जप्त केला होता. पाकिस्तानमधून मीठाच्या आयातीतून तो अंमली पदार्थांची तस्करी करीत असे. जम्मू काश्मीर आणि पंजाबमधील हिजबुल कार्यकर्त्यांशी त्याचा संबंध होता. हिजबुलच्या कार्यकर्त्यांला अटक केल्यानंतर या तस्करीची माहिती बाहेर आली होती. तेव्हापासून रणजीत राणा चीता हा फरार होता.

अंमली पदार्थांची तस्करी करणार्‍या देशातील सर्वात मोठ्या गँगचा तो म्होरक्या आहे. पाकिस्तानातील अतिरेकी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनच्या नेत्यांशी त्याचे संबंध असल्याचा संशय आहे. त्याच्यामार्फत काश्मीरमध्येही शस्त्र व अंमली पदार्थांची तस्करी केली जात असावी, असा पोलिसांना संशय आहे.