पुण्यात पोलिस चौकीत टोळक्याचा ‘राडा’ ; पोलिस कर्मचार्‍याला धक्‍काबुक्‍की

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस चौकी बाहेर एकाला चार ते पाच जण मारहाण करत होते. त्यामुळे मार खाणाऱ्या तरुणाला पोलीस हवालदाराने चौकीत आणले तेव्हा टोळक्याने चौकीत येऊन पोलीस हवालदाराची गचांडी पकडून त्याला बेल्टने मारहाण केली. त्यानंतर चौकीत राडा घातला. हा प्रकार खडक पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कासेवाडी पोलीस चौकीत गुरुवारी मध्यरात्री घडला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

सचिन सुखदेव गायकवाड (रा.कासेवाडी भवानीपेठ) आसीफ अब्दुल शेख (वय २९, रा. कासेवाडी), नजीर सलीम शेख (वय २२, रा. कासेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर त्यांचा साथीदार नीतीन गायकवाड याच्यासह चौघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा खडक पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार संजय नारायण दिघे ( वय ४६) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीस हवालदार संजय दिघे हे कासेवाडी पोलीस चौकीत कार्यरत आहेत. ते गुरुवारी चौकीत कार्यरत असताना अटक केलेले तिघे आणि त्यांचा साथीदार हे एकाला मारहाण करत होते. त्यावेळी त्यांना भांडणाचा आवाज आल्याने त्यांनी बाहेर धाव घेतली. तेव्हा संरक्षणासाठी मार खाणाऱ्या तरुणाला पोलीस चौकीत घेऊन दिघे आले. त्यांच्यापाठोपाठ चौघेजण चौकीत आले. त्यातील आसीफ अब्दुल शेख याने दिघे यांची कॉलर पकडून त्यांना बेल्टने मारहाण केली. त्यानंतर चौकीतील खुर्च्या अस्ताव्यस्त करून फेकल्या. चौकीत प्रचंड राडा घातला. पुढील तपास खडक पोलीस करत आहेत.

Loading...
You might also like